मूर्ती विसर्जनानंतर ट्रॉलीखाली चिरडून विद्यार्थी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 10:55 PM2017-08-31T22:55:22+5:302017-08-31T22:55:22+5:30

After killing the trolley crushed students under the trolley | मूर्ती विसर्जनानंतर ट्रॉलीखाली चिरडून विद्यार्थी ठार

मूर्ती विसर्जनानंतर ट्रॉलीखाली चिरडून विद्यार्थी ठार

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
तारळे : शाळेच्या गणेशमूर्तीचे विसर्जन करून परत येत असताना ट्रॅक्टरखाली सापडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. तारळे (ता. पाटण) येथे गुरुवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
शिवराज संतोष शेलार (वय १४) असे ठार झालेल्या मुलाचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, तारळे येथे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे छत्रपती विद्यामंदिर असून, याठिकाणी पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग आहेत. विद्यालयात दरवर्षी गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात येते. त्यासाठी विद्यालयाच्या खोलीत गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापनाही केली जाते. सातव्या दिवशी या मूर्तीचे भक्तीमय वातावरणात विसर्जन होते. यावर्षीही विद्यालयात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. गत सात दिवसांपासून शाळेत विविध कार्यक्रम घेण्यात आले. मूर्तीचे गुरुवारी विसर्जन असल्याने सकाळपासूनच शाळेत मिरवणुकीचे वातावरण होते. मिरवणुकीसाठी विद्यालयाने ट्रॅक्टर-ट्रॉली बोलावली होती. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शाळेतून ही मिरवणूक निघाली. गावातील मुख्य रस्त्यावरून ही मिरवणूक वेखंडवाडी रस्त्यावरील गोदामनजीक पोहोचली. तेथून काही अंतरावरच नदीपात्र असल्यामुळे शिक्षकांनी लहान मुलांना त्याचठिकाणी थांबवले. तर गावातील काही युवक तसेच शिक्षकांनी मूर्तीचे विसर्जन केले.
विसर्जन झाल्यानंतर शिक्षकांसह काही विद्यार्थी चालत विद्यालयाकडे निघाले. तर शाळेमध्ये इयत्ता आठवीत शिकणारा शिवराज शेलार हा अन्य काही मुलांसमवेत ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये बसला. ट्रॅक्टर शाळेच्या दिशेने निघाला असताना एका वळणावर ट्रॉलीमध्ये बसलेल्या शिवराजचा तोल जाऊन तो खाली कोसळला. त्याच्या अंगावरून ट्रॉलीचा टायर गेल्याने तो गंभीर जखमी झाला.
अपघात निदर्शनास येताच परिसरातील ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेतली. त्यांनी जखमी शिवराजला उपचारार्थ गावातीलच ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच शिवराजचा मृत्यू झाला. या घटनेनंतर ग्रामस्थांनी रुग्णालयाच्या परिसरात गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद पोलिसांत झाली नव्हती.
शाळेपासून हाकेच्या अंतरावर दुर्घटना
दुर्घटना घडली तेथून हाकेच्या अंतरावरच विद्यालय आहे. संबंधित वळण येण्यापूर्वी ट्रॅक्टरने आणखी दोन वळणे घेतली होती. मात्र, शिवराज त्यावेळी सावध बसला असावा. शाळेनजीकच्या वळणावर मात्र, ट्रॅक्टर ट्रॉलीला झोल बसल्याने शिवराजचा तोल गेला असण्याची शक्यता ग्रामस्थांतून व्यक्त केली जात आहे.

Web Title: After killing the trolley crushed students under the trolley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.