सातारा लोकसभा निवडणुकीनंतर अजूनही आचारसंहिता कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 04:08 PM2019-04-26T16:08:03+5:302019-04-26T16:10:59+5:30
लोकसभा निवडणुकीचे कुरुक्षेत्र आता शांत झाले आहे. मंगळवारी (दि.२३ एप्रिल) मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. मात्र, अजूनही आचारसंहिता कायम असल्याने दैनंदिन व्यवहारांवर काही प्रमाणात निर्बंध असल्याचे स्पष्ट चित्र आहे.
सागर गुजर
सातारा : लोकसभा निवडणुकीचे कुरुक्षेत्र आता शांत झाले आहे. मंगळवारी (दि.२३ एप्रिल) मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. मात्र, अजूनही आचारसंहिता कायम असल्याने दैनंदिन व्यवहारांवर काही प्रमाणात निर्बंध असल्याचे स्पष्ट चित्र आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून सातारा जिल्ह्यात लोकसभेचे कुरुक्षेत्र सुरू होती. २३ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यातील ११ लाख ९ हजार ४३४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. लोकसभा निवडणुकीसाठी यंदा १८ लाख ३८ हजार ९८७ मतदारांपैकी तब्बल ११ लाख ९ हजार ४३४ मतदारांनी मतदान केले. २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत ९ लाख ७६ हजार ६८१ मतदारांनी मतदान केले होते. यंदा ४ टक्क्यांनी मतदान वाढले आहे.
राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले व शिवसेनेचे नरेंद्र पाटील, वंचित बहुजन आघाडीचे सहदेव ऐवळे, आनंदा थोरवडे (बहुजन समाज पार्र्टी), दिलीप जगताप (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी), पंजाबराव पाटील (बळीराजा शेतकरी संघटना), शैलेंद्र वीर, सागर भिसे, अभिजित बिचुकले (अपक्ष) या उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंदिस्त झाले आहे.
आता २३ मे पर्यंत निकालाची वाट पाहावी लागणार आहे. मतदान झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता शिथिल होईल, असा अंदाज जिल्ह्यातील नागरिकांना होता. मात्र तसे अद्याप झालेले नाही. आचारसंहितेचे निर्बंध अजूनही कायम आहे.
रात्री उशिराच्या कार्यक्रमांवर बंदी कायम आहे. फेसबुक, ट्विटर तसेच इतर सोशल मीडियावर निवडणूक आयोगाची अजूनही करडी नजर राहणार आहे. महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यासाठी २९ एप्रिल रोजी मतदान घेतले जाणार आहे. यामुळे आचारसंहितेचे निर्बंध संपूर्ण महाराष्ट्रात कायम ठेवण्यात आले आहेत.
२९ मे रोजी या मतदार संघात मतदान
नंदूरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण, मावळ, शिरुर, शिर्डी या १७ मतदार संघात २९ एप्रिल रोजी मतदान घेतले जाणार आहे. हे सर्व मतदारसंघ महाराष्ट्रात येतात.
कार्यक्रमांवर बंदी
जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये यात्रा सुरू आहेत. या यात्रांमधील ग्रामदैवतांचा छबिना रात्रभर सुरू ठेवण्यात आला. मात्र, दुसऱ्या दिवशी रात्री होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांवर रात्री दहानंतर बंदी घालण्यात आली होती. अनेक गावांनी हे सांस्कृतिक कार्यक्रम सकाळच्या वेळेत घेतले.
लोकसभेची आचारसंहिता कायम आहे. निवडणूक आयोगाकडून अद्याप कोणतेही निर्देश प्राप्त झाले नाहीत, त्यामुळे आचारसंहितेचे निर्बंध अजूनही लागू आहेत.
- श्वेता सिंघल,
जिल्हा निवडणूक अधिकारी