पार्लेत दहा वर्षांनी राष्ट्रवादीच्या सत्तेला सुरुंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:37 AM2021-01-20T04:37:28+5:302021-01-20T04:37:28+5:30

कोपर्डे हवेली : पार्ले, ता. कऱ्हाड ग्रामपंचायतीत गत दोन पंचवार्षिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. यंदाच्या निवडणुकीत सत्ताधारी गट विकासकामे ...

After ten years in Parle, the NCP's power was undermined | पार्लेत दहा वर्षांनी राष्ट्रवादीच्या सत्तेला सुरुंग

पार्लेत दहा वर्षांनी राष्ट्रवादीच्या सत्तेला सुरुंग

Next

कोपर्डे हवेली : पार्ले, ता. कऱ्हाड ग्रामपंचायतीत गत दोन पंचवार्षिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. यंदाच्या निवडणुकीत सत्ताधारी गट विकासकामे घेऊन मतदारांपुढे गेला, तर विरोधी गट विकासातील त्रुटी दाखवीत निवडणुकीच्या रिंगणात उतरला. मात्र, योग्य नियोजन आणि संयमाने केलेला प्रचार, वैयक्तिक टिकाटिपणीला दिलेली बगल, यामुळे पार्लेत सत्तांतर झाले.

पार्लेत काँग्रेस, शेतकरी संघटना, नाराज गट यांनी सत्ता खेचून आणत सहा उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आणण्यात यश मिळविले, तर सत्ताधारी राष्ट्रवादी गटाला तीन उमेदवार निवडून आणता आले. यावेळी काँग्रेस, शेतकरी संघटना, नाराज गट यांचे नेतृत्व काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अविनाश नलवडे, रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, तसेच या पॅनलचे महत्त्वाचे उमेदवार मोहन पवार यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलचे नेतृत्व अशोकराव पाटील पार्लेकर, माजी सरपंच प्रकाश नलवडे, राहुल पाटील-पार्लेकर, तानाजीराव नलवडे, संपतराव नलवडे यांनी केले.

काही महिन्यांच्या अंतरावर निवडणूक असताना राजकारणावरून सोसायटीतर्फे चालविण्यात येत असलेल्या स्वस्त धान्य दुकानातील कर्मचारी मोहन पवार यांना तडकाफडकी काढून टाकण्यात आले, तर त्याठिकाणी दुसऱ्या कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आली. निवडणुकीत हा कळीचा मुद्दा ठरला. कर्मचाऱ्याबाबत घेतलेला निर्णय राजकीय सुडापोटी घेतला असल्याचा आरोप विरोधकांकडून झाला आणि तोच त्यांच्या पथ्यावर पडला. सत्ताधारी गटाने शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नासंदर्भात केलेले राजकारण, सत्ताधाऱ्यांच्या निकटवर्तीयांचा वाढता हस्तक्षेप यामुळे मतदारांमध्ये नाराजी वाढली. ही नाराजीही विरोधकांच्या पथ्यावर पडली. विकासकामे करताना केलेला पक्षपातीपणा हा मुद्दा विरोधकांनी उचलून धरला आणि भविष्यात आम्ही सर्वांना सोबत घेऊन विकासकामे करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. सत्ताधाऱ्यांच्या एकाधिकारशाहीमुळे अनेक जण नाराज होते. त्यांना बरोबर घेऊन सत्ता परिवर्तन करण्यात विरोधकांना यश आले आहे.

- चौकट

नलवडे विजयी; पाटलांचा पराभव

काँग्रेसचे अविनाश नलवडे, तर राष्ट्रवादीचे राहुल पाटील या दोघांच्या लढतीकडे जिल्ह्यातील अनेकांच्या नजरा लागून होत्या. अविनाश नलवडे यांनी प्रभाग दोनमध्ये दोनशे मतांची आघाडी घेत विजय संपादन केला, तर प्रभाग तीनमध्ये ८७ मतांनी राहुल पाटील यांना मोहन पवार यांच्याविरोधात पराभव पत्करावा लागला. प्रभाग एकमध्ये राष्ट्रवादीच्या मनीषा नलवडे, प्रवीण गुरव, सीमा नांगरे, प्रभाग दोनमध्ये अविनाश नलवडे, सुनंदा निकम, वंदना शिवदास, प्रभाग तीनमध्ये मोहन पवार, शुभांगी नलवडे, आश्विनी मदने हे उमेदवार विजयी झाले.

Web Title: After ten years in Parle, the NCP's power was undermined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.