वाईच्या जागेसाठी महाविकास आघाडीची मुंबईत खलबते!, नितीन सावंत ठाण मांडून
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 02:59 PM2024-10-26T14:59:46+5:302024-10-26T15:00:48+5:30
महायुतीकडून आमदार मकरंद पाटील यांची उमेदवारी जाहीर
खंडाळा : वाई विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून आमदार मकरंद पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीला शह देण्यासाठी दस्तुरखुद्द शरद पवार यांनी मुंबई येथे विशेष बैठक बोलावली. या बैठकीला राष्ट्रवादीकडून डॉ. नितीन सावंत यांच्या नावावर चर्चा झाल्याचे समजते. पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या व्यक्तीलाच मैदानात उतरवा, असा आग्रह निष्ठावंतांनी धरला. त्यामुळे महाविकास आघाडीकडून डॉ. नितीन सावंत यांचे नाव निश्चित होण्याची शक्यता आहे.
वाई विधानसभेसाठी एकीकडे आमदार मकरंद पाटील यांचा प्रचार सुरू झाला असताना, महाविकास आघाडीत जुळता जुळेना अशी स्थिती निर्माण झाली होती. सर्व इच्छुक उमेदवारांचे मनोमिलन करण्यावर वरिष्ठांचा कटाक्ष असल्याने मुंबईत मोठी खलबते सुरू होती. राजकीय इतिहासात खंडाळा तालुक्याला प्रथमच संधी मिळत असल्याने डॉ. नितीन सावंत यांच्या मागणीचा जोर होता, तर वाईमधून अरुणादेवी पिसाळ यांनीही उमेदवारीसाठी आग्रही मागणी लावून धरल्याचे समजते. त्यामुळे या जागेवरचा तिढा सोडवण्यासाठी पक्षश्रेष्ठींना कसरत करावी लागत आहे. मात्र, आमदार मकरंद पाटील यांना शह देण्यासाठी महाविकास आघाडी रणनीती आखत असल्याचे चित्र आहे. या राजकीय हालचालींकडे लक्ष लागले आहे.
निर्णय पवारांच्या कोर्टात
- या मतदारसंघातून तुतारी हाती घेण्यासाठी माजी आमदार मदन भोसले यांनी नकार दिला. त्यामुळे शरद पवार सावंत की, पिसाळ याबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटल्याने काँग्रेसचे विराज शिंदे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नंदकुमार घाडगे कोणती भूमिका घेणार हे महत्त्वाची ठरणार आहे.
शिंदेसनेचे उपजिल्हाप्रमुख प्रदीप माने यांचा अपक्ष अर्ज
- वाई विधानसभा मतदार संघासाठी शिंदेसेना गटाचे उपजिल्हाप्रमुख प्रदीप माने यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे महायुतीत बंडाळी झाली आहे. महायुतीसाठी हा मोठा धोका मानला जात आहे.
- महायुतीची उमेदवारी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातून आमदार मकरंद पाटील यांना जाहीर झाल्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करीत सहकार्य न करण्याची भूमिका घेतली होती.
- उपजिल्हाप्रमुख प्रदीप माने यांनी अपक्ष लढण्याचा निर्धार केला. त्यानुसार वाई येथे शक्तिप्रदर्शन करीत त्यांनी अर्ज दाखल केला आहे.
- वाई मतदार संघातील घराणेशाही आणि एकाधिकारशाही विरोधात आपण लढणार आहोत.
- सर्व शिवसैनिकांचा याला पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले. या उमेदवारीमुळे महायुतीला मोठा धक्का बसणार आहे. याशिवाय भाजपाचे कार्यकर्ते काय निर्णय घेणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
महायुतीला धक्का..
- मतदारसंघात गेली अनेक वर्षे विरोधी संघर्ष केलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदारांच्या उमेदवारी विरोधात नाराजी व्यक्त करून बंडाचा पवित्रा घेतला.
- जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी गावोगावी
- भेटी देऊन निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे, तर उपजिल्हाप्रमुख प्रदीप माने यांनीही अपक्ष अर्ज दाखल करून लढाईचे रणशिंग फुंकले आहे.
- त्यामुळे महायुतीला बंडाळीचा सामना करावा लागणार आहे.