मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन; राज्यातील संगणक परिचालकाच्या साताऱ्यातील आंदोलनाला १८ व्या दिवशी ब्रेक
By नितीन काळेल | Published: February 2, 2024 06:42 PM2024-02-02T18:42:45+5:302024-02-02T18:43:43+5:30
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि आमदार जयकुमार गोरेंच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण मागे
सातारा : मानधन नको, वेतन द्यावे यासह अन्य मागण्यांसाठी राज्यातील संगणक परिचालकांनी मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर १८ व्या दिवशी साताऱ्यातील आंदोलन मागे घेतले. तर संघटनेच्या अध्यक्षा सुनीता आमटे यांनीही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि आमदार जयकुमार गोरेंच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण मागे घेतले. आता मागण्या मान्य झाल्याने आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. सोमवारपासून सर्वजण कामावर हजर होणार आहेत.
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेच्या वतीने आणि राज्यध्यक्षा सुनीता आमटे यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा परिषदेसमोर दि. १६ जानेवारीपासून आंदोलन सुरू झाले होते. यामध्ये राज्यातील शेकडो संगणक परिचालक सहभागी झाले होते. यावलकर समितीच्या शिफारशीनुसार सुधारित आकृतीबंध घेऊन किमान वेतन द्यावे, शासनाने कंपनीला ठरवून दिलेल्या नियमावलीप्रमाणे कुशल कामगार वेतन ( २२ हजार ६००) इतके मानधन देण्यात यावे, कंपनीने लावलेली बोगस हजेरी आणि इन्व्हाईस तत्काळ बंद करावा.
कंपनीने विनाकारण लावलेले उद्दिष्ट बंद करण्यात यावे, आतापर्यंतचा हक्काचा पीएफ, भविष्य निर्वाह निधी खात्यात त्वरित जमा करण्याचे आदेश द्यावेत, २०११ ला संगणक आणि प्रिंटर दिले असून ते नादुरुस्त आहेत. हे सर्व नवीन देण्यात यावेत. मानधन प्रत्येक महिन्याच्या विशिष्ट तारखेलाच मिळावे, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू होते. तर संघटनेच्या अध्यक्षा सुनीता आमटे यांनी उपोषण सुरू केलेले.
दरम्यान, गुरुवारी संघटनेच्या शिष्टमंडळाने मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मागण्यांबाबत चर्चा केली. त्यावेळी मानधनवाढ आणि संबंधित कंपनी बदलण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले. त्यामुळे साताऱ्यातील राज्यव्यापी आंदोलन शुक्रवारी मागे घेण्यात आले. तसेच अध्यक्षा सुनीता आमटे यांनी सरबत घेऊन उपोषण सोडले. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे सातारा शहरप्रमुख नीलेश मोरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांचा जिल्हा म्हणून साताऱ्यात; महिलांचा सहभाग अधिक..
साताऱ्यातील संगणक परिचालकांचे हे आंदोलन राज्यव्यापी होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा म्हणून सातारा जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले होते. या उपोषणात अधिक करुन महिला संगणक परिचालकांचा समावेश असल्याचे दिसून आले. आंदोलनाच्या पहिल्या दिवसांपासून मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा निर्धारच परिचालकांनी केला होता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आमचा विश्वास होता. त्यामुळे मुंबईत त्यांना संघटनेचे शिष्टमंडळ भेटले. त्यांनी मागण्यांबाबत सकारात्मकता दाखवून शब्द दिला आहे. त्यामुळे आता आंदोलन मागे घेण्यात आले आहे. मागण्या मान्य केल्याने मुख्यमंत्र्यांचे आम्ही आभारी आहोत. तसेच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि आमदार जयकुमार गोरे यांनीही मागण्यांबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलनस्थळी येणार नाही असा शब्द दिलेला. मागण्या मान्य झाल्यानंतरच दोघेही आंदोलनस्थळी आले व आपला शब्द पाळला. त्यांचेही आभारी आहोत. आता सोमवारपासून आम्ही कामावर जाणार आहे. - सुनीता आमटे, राज्यध्यक्षा महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटना