साताऱ्यात दांडिया संपल्यानंतर तरुणांकडून हवेत गोळीबार
By दत्ता यादव | Published: October 5, 2022 01:28 PM2022-10-05T13:28:02+5:302022-10-05T13:28:35+5:30
चौघांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा; एक अल्पवयीन मुलगा ताब्यात
सातारा: दांडिया संपल्यानंतर रात्री बाराच्या सुमारास गाडी काढताना दुचाकीचे चाक पायावरुन गेल्याने दोन गटात शाब्दिक चकमक उडाली. याचे पर्यावसन फायरिंगमध्ये झाले. एका तरुणाने हवेत फायर करून दहशत माजवली. या प्रकारनंतर पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले तर चौघांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. अमीर शेख, अभिजीत भिसे, साहिल सावंत आणि आहात (सर्व रा. सातारा) यांच्यासह एका अल्पवयीन मुलाचा गुन्हा दाखल झालेल्या मध्ये समावेश आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, साताऱ्यात नवरात्रोत्सव काळात अनेक ठिकाणी दांडिया आणि गरबाचे आयोजन करण्यात आले होते. पोवई नाक्यावर एका खाजगी शाळेत दांडिया खेळाचे आयोजन करण्यात आलं होतं. रात्री 12 पर्यंत दांडियाचा खेळ सुरु होता. दांडिया खेळण्यासाठी तरुणाईचा जोश मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. दांडिया संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात युवकांची झुंबड मैदानाबाहेर पडली. यावेळी गाडी काढताना दुचाकीचे चाक पायावरुन गेल्याने दोन गटात शाब्दिक चकमक उडाली. वादाने ढोणे कॉलनीत उग्र रूप धारण केले. एका तरुणाने हवेत फायरिंग केल्याने परिसरात दहशत निर्माण झाली.
मात्र सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींचा शोध घेणे सुरु केलं. त्यावेळी एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले. आमिर शेख या संशयितांने फायरिंग केलं असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर येत आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांच्या दोन टीम तयार करण्यात आले असून या टीम सातारा शहरसह आजूबाजूच्या परिसरात आरोपींचा शोध घेत आहेत. शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे हे अधिक तपास करत आहेत.