पुसेसावळी चार दिवसांनंतर पूर्वपदावर, सातारा जिल्ह्यात ७२ तासांनंतर इंटरनेट सुविधा सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 12:01 PM2023-09-15T12:01:11+5:302023-09-15T12:21:36+5:30
बाजारपेठ खुली; व्यापारी पेठेत रहदारी वाढली; पोलिसांवरील ताण कमी
पुसेसावळी (सातारा) : दंगलीनंतर गत चार दिवसांपासून ताण-तणावामुळे धगधगणाऱ्या पुसेसावळी येथील आर्थिक व्यवहार पूर्ववत होण्यास सुरुवात झाली असून, जनजीवनही पूर्वपदावर येत आहे. गुरुवारी मुख्य बाजारपेठेतील बहुतांश दुकाने उघडून विक्रेते, व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार सुरू केले. त्याबरोबरच ग्रामस्थही घराबाहेर पडू लागल्यामुळे प्रशासनावरील ताण कमी झाला आहे.
पुसेसावळी येथे रविवारी रात्री आक्षेपार्ह पोस्टनंतर दंगल उसळली. जमावाने दुकानांची तोडफोड करत काही वाहने जाळली; तसेच प्रार्थनास्थळावर हल्ला करून तेथील ग्रामस्थांना मारहाण करण्यात आली. त्यामध्ये एका युवकाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पुसेसावळीतील वातावरण तणावपूर्ण बनले होते. रविवारी रात्रीपासून गावात प्रशासनाकडून संचारबंदी लागू करण्यात आली होती; तसेच बाजारपेठही पूर्णपणे बंद होती. या घटनेप्रकरणी पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. त्यामध्ये तीसपेक्षा जास्त आरोपींना अटकही करण्यात आले आहे.
दरम्यान, बुधवारी सायंकाळी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्यासह अपर पोलिस अधीक्षक बापू बांगर यांनी मुख्य बाजारपेठेत फिरून व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू करण्याचे आवाहन केले. त्यामुळे गुरुवारी सकाळपासून हळूहळू बाजारपेठ खुली होण्यास सुरुवात झाली. गावातील ३० ते ४० टक्के दुकाने गुरुवारी सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे येत्या दोन दिवसांत गावातील सर्व व्यवहार आणि जनजीवन पूर्वपदावर येण्याची चिन्हे आहेत.
सातारा जिल्ह्यात ७२ तासांनंतर इंटरनेट सुविधा सुरू
सातारा : पुसेसावळी येथे दंगल झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील इंटरनेट सोमवारपासून तीन दिवस बंद करण्यात आले होते. ही सेवा ७२ तासांनंतर सुरळीत करण्यात आली. ती बुधवारी मध्यरात्री साडेबारानंतर पूर्ववत करण्यात आली. त्यामुळे या काळात ठप्प झालेले सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले. शासकीय कार्यालयात कामासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
पुसेसावळीतील घटनेप्रकरणी दोन गुन्हे दाखल आहेत. या दोन्ही गुन्ह्यांचा कायदेशीर मार्गाने तपास सुरू आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. त्याबरोबरच जे दोषी नाहीत त्यांच्यावर अन्याय होणार नाही, याची खबरदारीही पोलिस दलाकडून घेतली जाईल. - बापू बांगर, अपर पोलिस अधीक्षक
गावातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. ग्रामस्थांनी गावात पूर्वीप्रमाणेच एकोपा राखावा. शांतताप्रिय गाव म्हणून गावाची ओळख आहे. ही ओळख जपण्याची जबाबदारी प्रत्येक ग्रामस्थांची आहे. येथील व्यापारीपेठ पूर्ण क्षमतेने लवकरच सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. - सुरेखा माळवे, सरपंच, पुसेसावळी