तीन दशकांनंतर सत्तांतर
By Admin | Published: March 25, 2015 10:37 PM2015-03-25T22:37:37+5:302015-03-26T00:08:38+5:30
विसापूर सोसायटी : पंचक्रोशी पॅनेलची बाजी; ‘शेतकरी विकास’चा धुव्वा
पुसेगाव : विसापूर, ता. खटाव येथील विकास सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत विसापूर पंचक्रोशी विकास पॅनेलने १३ पैकी ११ जागा जिंकून तीस वर्षे सत्तेत असणाऱ्या शेतकरी विकास पॅनेलचा धुव्वा उडवत निर्विवाद वर्चस्व मिळविले. त्यातच विसापूर ग्रामपंचायतीचीही पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर सोसायटीची ही निवडणूक अतिशय परिणामकारक ठरणार असल्याची चर्चा पंचक्रोशीत होत आहे. विसापूर, बुधावलेवाडी, बोबडेवाडी, गाववाडी, पांढरवाडी, रेवलकरवाडी व आवारवाडी कार्यक्षेत्र असलेल्या विसापूर सोसायटीत १२५६ सभासद आहेत. या निवडणुकीत पै. सागरभाऊ साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली विसापूर पंचक्रोशी पॅनेल तर प्रल्हाद सावंत यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनेल अशी राष्ट्रवादी अंतर्गत दुरंगी लढत होती. अत्यंत प्रतिष्ठेच्या झालेल्या या निवडणुकीत खटावचे तहसीलदार यांनी १४४ कलम जारी केले होते. सोसायटीच्या या निवडणुकीकडे भावी राजकारणाची दिशा देणारी निवडणूक म्हणून पाहिले जात होते. सोसायटीचे कार्यक्षेत्र मोठे असल्यामुळे दोन्ही पॅनेलकडून स्पीकरच्या गाड्या, फ्लेक्स बोर्ड, जनसंपर्क, कोपरा बैठका व जाहीरनामे काढून मतदारांना आकर्षिक करण्याचा प्रयत्न केला जात होता. दोन्ही पॅनेलने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. यामुळे या निवडणुकीकडे खटाव तालुक्यासह सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते.
विसापूर पंचक्रोशी विकास पॅनेलमधील विमुक्त जाती भटक्या जमाती गटातून बबन गोविंद बुधावले बिनविरोध निवडून आले, त्यामुळे १२ जागांसाठी निवडणूक झाली. (वार्ताहर)
विश्वासात
घेऊन कारभार...
शेतकरी सभासदांनी विसापूर पंचक्रोशी विकास पॅनेलवर विश्वास टाकून सत्तेची एकहाती सूत्रे दिलेली आहेत. त्या विश्वासाला तडा जाऊ न देता शेतीपूरक व्यवसाय, पारदर्शक कारभारांसह विविध योजना शेतकरी विकासाचा केंद्रबिंदू मानून प्रभावीपणे राबविल्या जातील. वरिष्ठ नेते, सहकारी, संचालक व शेतकरी सभासदांना विश्वासात घेऊन सोसायटीचा कारभार केला जाईल, असा विश्वास सागर साळुंखे यांनी व्यक्त केला.