भाजणीसाठी डोक्यावर वीस नंतर सायकलवर शंभर
By Admin | Published: March 9, 2015 09:36 PM2015-03-09T21:36:40+5:302015-03-09T23:47:46+5:30
.... महिलांची भरारी : वीटभट्टीवर काम शिकून आर्थिक स्वावलंबन
आदर्की : लग्नाच्या वरातीत पुरुषांनी वाद्य वाजवायची; पण महिलांनी घरोघरी जाऊन शिळंपाक मागून पोटाची गुजराण करायची. ही परंपरा मोडीत काढीत आदर्की बु।। ता. फलटण येथील कष्ट करण्याची जिद्द उराशी बाळगून वीटभट्टी कामगार म्हणून महिलांनी वीटभट्टीवर वीट तयार करून वीट भाजण्यासाठी नेताना डोक्यावर वीस आणि सायकलवर शंभर विटा वाहण्याचा प्रयोग करत आहेत. आदर्की बु।। ता. फलटण येथे ओढ्याच्या कडेला गोपाळ समाजाची वस्ती आहे. वीस वर्षांपूर्वी पुरुष मंडळी लग्न, वरात आदी शुभकार्यात वाद्य वाजवण्याचा व्यवसाय करायचे. तेव्हा पुरुषांचे जेवण भागायचे; पण महिलांची उपासमार व्हायची. म्हणून लहान मुले झोपडीबाहेर पडून शिळंपाक अन्न आणून उदरनिर्वाह करायची; पण नवीन पिढीने कष्ट करण्याची जिद्द उराशी बाळगून पुरुषांनी बँड वाजवायचे, तर महिलांनी शेतकरी वर्गाच्या बांधावर जाऊन शेत मजुरी करायचे. त्याच वेळी मातीशी इमान राखणारा गोपाळ समाजातील पुरुष-महिलांनी वीटभट्टी मालकाकडे वीट बनवायची कला आत्मसात केली. कष्ट करण्याची जिद्द उराशी बाळगून पुरुष लग्नसराईत वाद्य वाजवण्यास बाहेर गेले तरी महिला वर्ग वीटभट्टीवर चिखल करणे, विटा बनविण्याचे स्वत: करत आहेत. एकावेळी डोक्यावर वीस विटा वाहून नेणे महिलांना शक्त होते. कमी वेळात जास्त विटा वाहून नेता यावेत म्हणून त्यांनी सायकलचाही आधार घेतला. आता एकावेळी शंभर विटा वाहून नेऊन त्या काम करत आहेत. इतरांची घरे बांधण्यासाठी मोठा वाटा उचलणाऱ्या या महिला स्वत: मात्र पत्र्याची पाने ठोकून झोपडीवजा घरात आयुष्य जगत आहेत. लोकांचे उंचच उंच इमले बांधणाऱ्या या महिला त्यांच्या या झोपडीतही तितक्याच खूश राहतात. (वार्ताहर) स्वत:च घडवला व्यवसाय आदर्की बु।। येथे चार-पाच तरुणांनी वीटभट्टी व्यवसाय सुरू केला. त्याला १० ते ५० हजार उचल देऊन परप्रांतीय व पर जिल्ह्यातील कामगार आणले. मात्र रातोरात कुटुंबासह परप्रांतीय पळून जात असल्याने वीट व्यवसाय धोक्यात आला. हे लक्षात आल्यानंतर बाहेरील कामगारांवर अवलंबून न राहता त्यांनी महिलांना शिकविण्याचे ठरविले. आता या महिला चिखल करण्यापासून विटा बनविण्याचे काम उत्कृष्ट पद्धतीने करत आहेत.