..अखेर दोन महिन्यांनी कऱ्हाडचा आठवीतला बेपत्ता मुलगा सापडला पंजाबमध्ये!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 05:02 PM2022-08-16T17:02:26+5:302022-08-16T17:03:03+5:30
नातेवाईकांकडे गेलेला संबंधित शाळकरी मुलगा तेथून अचानक बेपत्ता झाला. अन्
संजय पाटील
कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यातील पाडळी येथील आठवीत शिकणारा साईनाथ चव्हाण हा मुलगा जून महिन्यात अचानक बेपत्ता झाला होता. मिरारोड येथील नातेवाईकांच्या घरातून तो निघून गेला होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके ठिकठीकाणी तपास करीत होती. अखेर दोन महिन्यांनी बेपत्ता साईनाथ पंजाबच्या अमृतसरमध्ये पोलिसांना आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी बालसुधारगृहात ठेवले आहे.
तालुक्यातील पाडळी येथील शाळकरी मुलगा साईनाथ चव्हाण हा जून महिन्यात मिरारोड येथे नातेवाईकांकडे गेला होता. तेथून तो अचानक बेपत्ता झाला. हे प्रकरण मिरारोड पोलिसांनी अत्यंत गांभिर्याने घेत सर्व शक्यता गृहीत धरून तपास सुरू केला. पोलीस उपायुक्त अमित काळे, पोलीस निरिक्षक विजयसिंग बागल यांच्या मार्गदर्शनाखाली मिरारोडच्या पोलीस उपनिरिक्षक स्नेहल तांबडे या तपासासाठी कऱ्हाडला आल्या होत्या. त्यांनी शहर व ग्रामिण पोलिसांच्या मदतीने साईनाथचा शोध घेतला. तसेच तो कोणाच्या संपर्कात होता, याची चौकशी करून अनेकांचे जबाब घेतले. त्यावेळी पोलिसांच्या हाती काही महत्वाची माहिती लागली.
त्यानुसार पोलीस उपनिरिक्षक स्नेहल तांबडे यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरिक्षक वंजारी, कॉन्स्टेबल पवार, कॉन्स्टेबल हर्णे, कॉन्स्टेबल चकोर यांचे पथक गत आठवड्यात पंजाबला रवाना झाले. पंजाबच्या अमृतसर, गुरूदासपूर भागात साईनाथचा कसून शोध घेत पोलिसांनी पंजाबमधील काही संस्थांशीही संपर्क साधला. चार दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर अमृतसर येथील गोल्डन टेम्पलमध्ये साईनाथ आढळून आला. पोलिसांनी त्याला मिरारोड येथे आणले असून बालसुधारगृहात त्याला ठेवण्यात आले आहे.
कऱ्हाडच्या शाळेत शिकणारा मुलगा मिरारोडमधून बेपत्ता झाल्याने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता. पंजाब राज्यात तो गेला असावा असे धागेदोरे हाती लागल्याने मुलाच्या शोधासाठी आम्ही पंजाबला रवाना झालो. तो तेथे सापडला. तो नेमका कोणत्या कारणासाठी गेला होता, याचा तपास वरिष्ठांमार्फत सुरू आहे. - स्नेहल तांबवे, तपासी अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक, मिरारोड