वीकेंड लॉकडाऊननंतर जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांत झुंबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:38 AM2021-04-13T04:38:13+5:302021-04-13T04:38:13+5:30
मलकापूर : शासनाच्या दोन दिवसांच्या वीकेंड लॉकडाऊनंतर मलकापुरात घरा-घरातील नागरिक साहित्य घेण्यासाठी घराबाहेर पडले. मिळेल त्या दुकानात नागरिक पोहोचल्यामुळे ...
मलकापूर : शासनाच्या दोन दिवसांच्या वीकेंड लॉकडाऊनंतर मलकापुरात घरा-घरातील नागरिक साहित्य घेण्यासाठी घराबाहेर पडले. मिळेल त्या दुकानात नागरिक पोहोचल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांत एकच झुंबड उडाली. कऱ्हाड - ढेबेवाडी मार्गावर मंडईत तर खरेदीसाठी तोबा गर्दी झाली होती. अशा ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचा मात्र फज्जा उडाला होता. मलकापूर फाटा व कऱ्हाड-ढेबेवाडी मार्गावर अनेकवेळा वाहतूक कोंडीचे प्रकार घडले आहेत.
राज्यात व जिल्ह्यात गेल्या काही दिवसांतील परिस्थितीनुसार जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. हे विचारात घेऊन शासन व जिल्हा प्रशासन काय घोषणा करणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर शासनाने मोठा निर्णय घेतला. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव थांबवण्यासाठी संचारबंदीसह ३० एप्रिलपर्यंत ब्रेक द चेन मोहीम लागू केली. पाच दिवस कडक निर्बंध लावत वीकेेंडला दोन दिवस लॉकडाऊन पुकारले. जिल्ह्यातही शनिवार, रविवार दोन दिवस लॉकडाऊनची घोषणा केली होती. ही घोषणा होताच मलकापुरात शुक्रवारी घरा-घरातील नागरिक आवश्यक साहित्य घेण्यासाठी तातडीने घराबाहेर पडले होते. तशाच पध्दतीने दोन दिवसांच्या लॉकडाऊननंतर मिळेल त्या दुकानात नागरिक पोहोचल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानात एकच झुंबड उडाली होती. यावेळी छोट्या-छोट्या बझारसह दुकानांतून गर्दी होती. गर्दीला आवरताना दुकानदारांना चांगलीच कसरत करावी लागली. रांगेत येणाऱ्यांना व एका वेळेस पाचच नागरिकांना प्रवेश देत असल्यामुळे येथील डी मार्टच्या प्रवेशद्वारावरच गर्दी झाली होती. दुकानांसमोर लांब रांगा लागल्या होत्या. तसेच कऱ्हाड-ढेबेवाडी मार्गावर मंडईत खरेदीसाठी तोबा गर्दी झाली होती. असे असताना गांभीर्य नसल्यासारखे अनेक नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत होते. त्यामुळे अशा ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला होता.
चौकट
गुढीपाडव्यासाठी कळक खरेदीची लगबग
मलकापूर फाटा व कऱ्हाड-ढेबेवाडी मार्गावर शुक्रवारी काही ठिकाणी गुढीपाडव्यासाठी कळक विक्रेते बसले होते. लॉकडाऊनचे काय होणार, या विचाराने अनेक नागरिकांनी कळक खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती.
चौकट
दुकानाच्या गेटवर बाचाबाची
शनिवार, रविवार दोन दिवस लॉकडाऊनची घोषणा केली. ही घोषणा होताच मलकापुरात शुक्रवारी घरा-घरातील लोक तातडीने साहित्य घेण्यासाठी घराबाहेर पडल्यामुळे इतर दुकानांसह येथील मॉलमध्येही ग्राहकांची गर्दी होती. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मॉलच्या प्रशासनाने गेटवरच कर्मचारी ठेवले होते. यावेळी गेटवरच कर्मचारी व ग्राहकांमध्ये अनेकवेळा बाचाबाची झाली.