आत्महत्येची चिठ्ठी लिहून दहावी पास मुलीने सोडले घर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 10:41 PM2018-07-08T22:41:43+5:302018-07-08T22:41:58+5:30
मेढा : कुडाळ, ता. जावळी येथील ज्योती नंदकुमार पवार (वय १६) हिने दहावीची परीक्षेत ७७ टक्के गुण कमी मिळाल्याने आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून रविवारी पहाटे साडेपाच वाजता घर सोडले. या प्रकारानंतर हादरलेल्या कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला असून, अद्याप ती सापडली नाही.
ज्योती पवार ही दहावीच्या परीक्षेत ७७ टक्के गुण मिळाले आहेत. निकाल लागल्यानंतर कमी गुण मिळाल्याने ती शांत होती. अशातच रविवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ती झोपेतून उठली.
आजीला अंघोळीला पाणी दिल्यानंतर नळाचे पाणी भरते, असे सांगून ती घराबाहेर पडली. परंतु ती बराच वेळ परत न आल्याने कुटुंबीयांच्या लक्षात आले. ज्योतीचा शोध घेण्यास सुरुवात झाल्यानंतर कुटुंबीयांना घरामध्ये ज्योतीने लिहिलेली एक चिठ्ठी सापडली. ती चिठ्ठी वाचल्यानंतर पवार कुटुंबीय हादरून गेले. ‘दहावीमध्ये मला कमी मार्कस मिळाले आहेत. त्यामुळे नैराश्यातून मी माझा जीव देत आहे. याला कोणालाही जबाबदार धरू नये,’ असे चिठ्ठीमध्ये तिने लिहिले आहे. ही चिठ्ठी ज्योतीच्या वडिलांनी पोलिसांकडे दिली असून, पोलिसांनी ज्योतीच्या शोधासाठी विविध ठिकाणी पथके रवाना करण्यात आली आहेत.