पुन्हा अक्षय तृतीयेचा मुहूर्त हुकला; लग्नसोहळे लॉकडाऊन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:39 AM2021-05-14T04:39:27+5:302021-05-14T04:39:27+5:30
सातारा : उत्तम मुहूर्त म्हणून ज्याची प्रतीक्षा केली जाते, असा अक्षय तृतीयेचा मुहूर्त यंदाही वाया गेला आहे. लॉकडाऊन सुरू ...
सातारा : उत्तम मुहूर्त म्हणून ज्याची प्रतीक्षा केली जाते, असा अक्षय तृतीयेचा मुहूर्त यंदाही वाया गेला आहे. लॉकडाऊन सुरू असल्यामुळे लग्न ठरवून ठेवलेल्या अनेक जोडप्यांना आता पुढच्या मुहूर्ताची प्रतीक्षा करावी लागणार आहे. नोकरीनिमित्त परदेशी असलेल्या आणि केवळ लग्नासाठी भारतात आलेल्यांनीच या लॉकडाऊनमध्ये लग्नगाठ बांधली आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, प्रशासनाने सध्या सर्वत्रच कडक निर्बंध लावले आहेत. सार्वजनिक कार्यक्रम, उत्सव, सण यासह लग्न समारंभही साध्या पध्दतीने करण्याचे निर्देश दिल्याने अनेक वाग्दत वधू-वर आणि त्यांच्या कुटुंबियांनी लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर थाटात लग्न करण्याचे नियोजन केलेल्यांना आता पुन्हा नव्या मुहूर्ताची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
परदेशात नोकरी आणि व्यवसायानिमित्ताने असणाऱ्या काहींनी मात्र नियोजित वेळेत शासनाचे नियम पाळून लग्नगाठ बांधली. अवघ्या महिना-दीड महिन्याच्या सुट्टीसाठी आलेल्यांना नोकरीकडे गेल्यावर रजा मिळेल, याची शाश्वती नाही. त्यामुळे या सगळ्यांनी ठरलेल्या वेळेत लग्न करून पुन्हा जाण्याचीही तयारी केली आहे. काहींनी शासनाच्या नियमाला हारताळ फासत कास बामणोली येथील रेसॉर्ट आणि हॉटेल्समध्ये डेस्टिनेशन वेडिंगही थाटात उरकले.
चौकट :
मे महिन्यातील मुहूर्त
१, २, ३, ४, ५, ८, १३, १५, २०, २१, २२, २४, २६, २८, ३०, ३१
मंगल कार्यालयांचे गणित बिघडले
मंगल कार्यालये बंद असली तरीही तेथे कायमस्वरूपी काम करणाऱ्या कामगारांचे पगार, कर्जाचे हप्ते, वीज या सगळ्या गोष्टींचा खर्च मंगल कार्यालय चालकांना करावा लागत आहे. गतवर्षीपासून नोव्हेंबर-डिसेंबर महिना बरा होता. मे महिन्यात आठ बुकिंग होती. त्यापैकी एकच लग्न झालं. १५हून अधिक व्यवसाय मंगल कार्यालयावर अवलंबून असतात, ते सगळे आता कोलमडले आहेत, अशी माहिती मंगल कार्यालय व्यावसायिक मंगेश जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
नियमांचा अडसर
लग्नसोहळा पार पाडायचा असेल तर एकूण २५ लोकांना प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. यात कुटुंबीय, ब्राह्मण, वाजंत्री, यासह वाढप्यांचाही समावेश आहे. इतक्या कमी लोकांसाठी अख्खं कार्यालय बुक करणं परवडत नाही. या लॉकडाऊनच्या काळात केवळ तीन विवाह पार पडले. नोकरीनिमित्त परदेशी असलेल्या मुला-मुलींनी सुट्टी आहे, तेवढ्या दिवसात लग्न उरकून घेतलं. बाकी सगळ्यांनी विवाहाच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत.
कोट :
आमच्या मुलीचं लग्न आम्ही ठरवून ठेवलं. रमजान ईदनिमित्ताने पाहुणे येतील, तेव्हाच लग्न करायचं होतं. पण कोरोनाची स्थिती वाढू लागल्याने आम्ही हे लग्न नोव्हेंबरनंतर घ्यायचं ठरवलं आहे. लेकीबरोबर जास्तीचा वेळ घालवता येईल, असा सकारात्मक विचार आम्ही केला.
- इसाक बागवान, वधू पिता
धाकट्या लेकीचं लग्न मार्चमध्ये झाल्यानंतर मे महिन्यात मुलाचं लग्न धुमधडाक्यात करायचं, असं ठरवलं. पण सगळीकडेच कोविड रूग्ण आढळू लागल्याने लग्न अवघ्या २५ जणांत केलं. आमच्या घरातील शेवटचं लग्न असल्याने आम्हाला याचं मोठं साजरीकरण करता आलं नाही.
- पांडुरंग जाधव, वर पिता