संगणकाच्या युगात टपालपेटी लुप्त होण्याच्या मार्गावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:40 AM2021-05-27T04:40:35+5:302021-05-27T04:40:35+5:30

कुडाळ : सध्याचे युग हे संगणकाचे युग आहे. एकमेकांशी संवादासाठी आता मोबाईलची क्रांती झाली आहे. आधुनिक संदेशवहनासाठी पूर्वीच्या पत्राची ...

In the age of computers, mailboxes are on the verge of disappearing! | संगणकाच्या युगात टपालपेटी लुप्त होण्याच्या मार्गावर!

संगणकाच्या युगात टपालपेटी लुप्त होण्याच्या मार्गावर!

Next

कुडाळ : सध्याचे युग हे संगणकाचे युग आहे. एकमेकांशी संवादासाठी आता मोबाईलची क्रांती झाली आहे. आधुनिक संदेशवहनासाठी पूर्वीच्या पत्राची जागा आता ई-मेल, मेसेजने घेतली आहे. दूरवरचा प्रवास घडून हाती पडलेल्या पत्रासाठी आतुरतेने वाट पाहणारे बसल्या जागी एकमेकांशी संवाद साधत आहेत. यामुळे लालरंगाची पत्रपेटी आता दिसेनाशी झाली आहे. गतिमान युगात याची जागा आता संगणकाने घेतली आहे.

आजघडीला तार, पत्र बंद झाले आहे. पत्रामधला प्रेमभाव, आदर आपल्या लिखाणातून होणारी देवाणघेवाण मोबाईल आणि संगणकाच्या कळफलकावर आली आहे. यामुळे लिखाणाचा सराव काहीसा थांबलाच म्हणायला हरकत नाही. पूर्वीच्या काळी गावात पत्र वाचणारे आणि लिहिणाऱ्यांची मोजकी संख्या असायची. त्यांच्याकडे जाऊन आपले निरोप, खुशाली सांगून पत्राद्वारे पाठवत असत. आज काळ बदलला आहे. प्रगती होत परस्पर संवादाची साधने बदलली, शिक्षण आणि तंत्रज्ञानाने क्रांती घडवत सर्वांचेच जीवन बदलले.

प्रत्येक गावात पत्रापेटीसाठी लाल डबा लटकवलेला असायचा, आता मात्र तो कुठेही दिसेनासा झाला आहे. खाकी पोशाखातील पोस्टमन यातील सारी पत्रं गोळा करून पुढे पाठवत असे. आजही ज्याठिकाणी अजूनही तंत्रज्ञान पोहोचले नाही, तेथे याचाच वापर होत आहे. त्यावेळी येणाऱ्या आणि जाणाऱ्या पत्राची उत्सुकता लागून असायची. आज मात्र तंत्रज्ञानाच्या युगात हा पत्रप्रपंच काहीसा दुरावलेलाच आहे. सध्या ५० पैशाचे साधे पत्र, २ रुपये ५० पैशात मिळणारे आंतर्देशीय पत्र मात्र बदलत्या काळाबरोबर आपल्यातील संवादातूनही निघून गेल्यासारखेच आहे.

चौकट...

आधुनिक प्रगतीची किमया...

पूर्वीच्या काळात तंत्रज्ञानाची फारशी प्रगती झालेली नव्हती. दूरवरच्या संवादासाठी पत्र हेच एकमेव साधन होते. आपत्कालिन प्रसंगी तार, टेलिग्रामचा उपयोग व्हायचा. आजच्या संगणकीय युगात यात आमुलाग्र बदल झालेला आहे. बसल्या जागी मोबाईलसारख्या छोट्याशा साधनाच्या मदतीने जगातील कोणत्याही कानाकोपऱ्यापर्यंत थेट संवाद साधला जात आहे. ही सारी आधुनिक प्रगतीची किमया आहे.

Web Title: In the age of computers, mailboxes are on the verge of disappearing!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.