गाईला गळफास बसला म्हणून वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या
By admin | Published: May 14, 2016 12:36 AM2016-05-14T00:36:09+5:302016-05-14T00:37:51+5:30
सातारा जिल्ह्यातील मुनावळे येथील घटना
सातारा : कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वीस किलोच्या घणाने दगड फोडणारे हात लाडक्या गायीचा प्राण वाचवू शकले नाहीत. जीवापाड जपलेल्या गायीचा फास लागल्याने मृत्यू झाल्याचा धक्का सहन न झाल्याने जावळी तालुक्यातील मुनावळे येथील सत्तर वर्षीय कोंडिबा कृष्णा पवार यांनी शुक्रवारी आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
कोंडिबा पवार मुनावळे येथे आपली पत्नी अनुसया आणि दोन मुलांबरोबर राहत होते. त्यांचा एक मुलगा मुंबईला असतो तर दुसरा मुलगा त्यांच्याबरोबरच शेतीत काम करतो. कोंडिबा यांना शहरीकरण कधीच आवडले नाही म्हणूनच कधी औषधोपचारासाठीही त्यांनी शहरात पाय ठेवला नाही. गावाकडे उपलब्ध असणाऱ्या वनौषधी हेच त्यांचे उपचार होते. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे दगड फोडून त्यांनी पोर बाळं जगवली.
स्वत:च्या पोटाला चिमटा काढून पशुधन सांभाळणे ही त्यांची परिसरातील खास ओळख. पवार यांची लाडकी गाय गाभण राहिली होती. पित्याच्या हृदयाने पवार तिच्याकडे लक्ष देत होते. गुरुवारी रात्रीचे जेवण उरकल्यानंतर ते सवयीप्रमाणे वस्ती जवळील रानात गोठ्यामध्ये झोपायला गेले. तेथे त्यांना दोराला हिसके देऊन देऊन गाय मृत्युमुखी पडल्याचे दिसले. हा धक्का सहन न झाल्याने गोठ्या शेजारीच असलेल्या आंब्याच्या झाडाला फास घेऊन आत्महत्या केली.
रोज सकाळी सहा वाजता पवार गावातील घरी येत असत. शुक्रवारी ते न आल्याने घरातील थोडे काळजीत होते; मात्र शेतात गवारी तोडत असतील, असा समज करून कोणीच गोठ्याकडे फिरकले नाहीत. गावातील ग्रामस्थाने पवार यांनी गळफास घेतल्याचे कुटुंबीयांना कळवले. त्यानंतर सर्वांनीच वस्तीकडे धाव घेतली. गोठ्यात ज्या पद्धतीने गायीचा मृत्यू झाला होता, त्याच पद्धतीने पवार यांचाही मृत्यू झाला होता.
या घटनेची नोंद मेढा पोलिस ठाण्यात झाली आहे. (प्रतिनिधी)