स्वातंत्र्य दिनाच्या शुभ मुहूर्तावरच शिरंबे ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2023 08:18 PM2023-08-15T20:18:09+5:302023-08-15T20:18:25+5:30
बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या युवकास शिकवला चांगलाच धडा, भर रस्त्यावरच दारूच्या बाटल्या फोडून टाकल्या
कोरेगाव - रहिमतपूर रस्त्यावरील मुख्य बाजारपेठेचे गाव असलेल्या शिरंबे येथे सर्व शासकीय कार्यालयांनजिक मध्यवर्ती ठिकाणी बेकायदेशीर दारूची विक्री करणाऱ्या राहुल सुतार या युवकाला स्वातंत्र्य दिनाच्या शुभ मुहूर्तावर ग्रामस्थांनी विशेषतः युवक कार्यकर्त्यांनी चांगलाच धडा शिकवला. त्याच्या ताब्यातील दारूच्या बाटल्या भर रस्त्यावर फोडत त्याला पुन्हा दारू विक्री न करण्याची समज दिली. ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा पाहून राहूल सुतार याने यापुढे गावात दारू विक्री न करण्याची शपथ सर्वांसमोर घेतली.
शिरंबे येथे महसूल मंडल अधिकारी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय व विविध मंदिरे आहेत. या परिसरात स्थानिक युवक राहूल सुतार हा स्वतः गेले अनेक दिवस बेकायदेशीररित्या देशी दारूची विक्री करत आहे. याबाबत ग्रामस्थांनी रहिमतपूर पोलीस ठाण्यास वारंवार माहिती देऊन देखील जुजबी कारवाई केली जात होती, मात्र दारू विक्रीवर कोणताही पायबंद घालण्यात आला नव्हता. स्वातंत्र्यदिना दिवशी म्हणजेच दिनांक १५ ऑगस्ट रोजी सर्वत्र दारू विक्रीची दुकाने बंद असताना सुतार याने मोठ्या प्रमाणावर देशी दारूच्या दारूच्या बाटल्या आणून स्टॉक केला असल्याची माहिती युवकांना मिळाली.
ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी सुतार याला दारू विक्री न करण्याचे समज दिली. मात्र त्याने अर्वाच्च भाषेत प्रत्युत्तर करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संतप्त झालेल्या युवकांनी आणि ग्रामस्थांनी त्याला चांगलाच धडा शिकवला. त्याच्या ताब्यातील देशी दारूच्या बाटल्या भर रस्त्यावर फोडून टाकत, त्याला चांगलीच समज दिली. त्यानंतर त्याने सर्वांसमोर जाहीररित्या प्रतिज्ञा करत, यापुढे दारू विक्री करणार नसल्याचे सांगितले.
दरम्यान, ग्रामस्थ गावातील दारू विक्रीबाबत चांगलेच आक्रमक झाले असून रहिमतपूर येथून एक महिला शिरंबे येथे येऊन दारू विक्री करत असल्याची त्यांची तक्रार आहे. या महिलेवर कारवाई करावी यासाठी पोलीस अधीक्षक समीर शेख व कोरेगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शेळके यांची लवकरच भेट घेऊन सविस्तर माहितीचे निवेदन देण्यात येणार आहे, त्याचबरोबर दारू विक्रीचे पुरावे सादर करणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.