मुलावर अघोरी कृत्य, चिडचिड करते म्हणून दिले चटके; मिरजेतील पाच जणांवर जादुटोण्याचा गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 11:47 AM2022-02-28T11:47:30+5:302022-02-28T11:48:39+5:30
मुलाला सलग दोन दिवस मंत्रतंत्र करून टांगले गेले
सातारा : लहान मूल चिडचिड करत असल्याने त्यावर उपाय म्हणून मुलाला चटके देणे, गळ्याला घट्ट काळा दोरा बांधणे, घरात लटकवणे यासारखे अघोरी कृत्य केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील मिरजमधील पाचजणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात जादूटोणा कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
मेहबूब कादर अली, शमशुद्दीन मेहबुब अली, शमशुद्दीन कादर अली, मुमताज मेहबूब अली, फातिमा सरफराज पठाण (सर्व रा. शमनामिरा काॅलनी, ख्वाजा बस्ती रेल्वे स्टेशन पाठीमागे, मिरज, जि. सांगली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत सरफराज खलील पठाण (४२, रा. समर्थनगर, एमआयडीसी, सातारा) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सरफराज यांना तीन मुले आहेत. यातील एक लहान मुलगा नेहमी चिडचिड करत असे. त्यामुळे त्यांची पत्नी मुलांना घेऊन काही दिवसांपूर्वी मिरजला गेली होती. त्यावेळी या सर्व मुलांचे टक्कल करण्यात आले. तर एका मुलाला सलग दोन दिवस मंत्रतंत्र करून टांगले गेले. मिरजवरून साताऱ्यात आल्यानंतर मोठ्या मुलीने हा प्रकार वडिलांना सांगितला.
लाॅकडाऊनमध्ये मुलगा जास्तच चिडचिड करू लागला. यामुळे पठाण यांच्या पत्नीने वरील संशयितांच्या सांगण्यावरून मुलाला चटके दिले. अशा प्रकारची अघोरी कृत्य वारंवार होऊ लागल्यानंतर पठाण यांनी वरील संशयितांविरोधात गुन्हा दाखल करावा, असा न्यायालयात अर्ज केला.
या अर्जावर सुनावणी होऊन न्यायालयाने मिरजमधील पाचजणांवर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांना आदेश दिले. यावरून पोलिसांनी रविवारी संशयितांवर गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक मछले हे अधिक तपास करीत आहेत.