शांतता बैठकीत पोलिसांवर आगपाखड
By Admin | Published: March 10, 2015 10:33 PM2015-03-10T22:33:26+5:302015-03-11T00:12:17+5:30
नागरिकांचा रोष : समित्या केवळ कागदावरच उरल्याचा आरोप
कऱ्हाड : कऱ्हाड शहर पोलिसांचा सर्वसामान्यांशी संपर्कच नाही. त्यामुळे सामान्यांच्या अडचणी, त्यांच्या अपेक्षा व त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत पोलिसांना कसलीच माहिती नसते. मोहल्ला समिती, पोलीस मित्र अशा अनेक समित्या पोलिसांनी स्थापन केल्या आहेत. मात्र, या समित्या केवळ कागदावरच उरल्या असल्याचा आरोप नागरीकांनी शांतता समितीच्या बैठकीत केला. कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात सोमवारी सायंकाळी शांतता समितीची बैठक आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीस उपअधिक्षक मनोज पाटील, प्रांताधिकारी किशोर पवार, तहसिलदार सुधाकर भोसले, पोलीस निरीक्षक राजेंद्र राजमाने, आप्पा गायकवाड, दादा शिंगण, सागर बर्गे, फारूख पटवेकर, मजहर कागदी, बादशाहभाई मुल्ला यांच्यासह अनेक नागरीक उपस्थित होते. शांतता समितीची बैठक कायदा व सुव्यवस्थेबाबत होते. मात्र, एकही नगरसेवक किंवा नगराध्यक्ष या बैठकीला उपस्थित राहत नाहीत. नगरसेवकांना कऱ्हाडातील शांततेशी काही देणंघेणं नाही, असा आरोपही उपस्थित नागरीकांनी यावेळी केला. आप्पा गायकवाड यांनी पोलिसांकडून शांतता समितीच्या सदस्यांना मिळणाऱ्या सन्मानावरच बोट ठेवले. पोलिसांकडून सन्मान मिळत नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. मजहर कागदी यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले.
मनसेचे सागर बर्गे यावेळी बोलताना म्हणाले, शांतता समितीची बैठक महत्वाची असते. मात्र, या बैठकीला असलेली अत्यल्प उपस्थिती चिंताजनक आहे. पोलीस व पालिका प्रशासनाची जागरूकता त्यावरूनच दिसुन येते. पोलिसांचा सामान्यांशी कसलाही संपर्क नाही. सामान्य लोकांमध्ये किंमत असणाऱ्या नागरीकांना पोलिसांनी शांतता समितीच्या बैठकीस बोलविणे गरजेचे आहे. पूर्वी शांतता समितीची बैठक होत होती. त्यावेळी नागरीक मोठ्या संख्येने या बैठकीला उपस्थित रहायचे; पण सध्या पोलिसच सामान्यांना जवळ करीत नसल्याने बैठकांकडे पाठ फिरविली जात आहे. (प्रतिनिधी)
दोषींवर कठोर कारवाई होईल
उंब्रजमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कऱ्हाडात शांतता कायम राखली, ही बाब कौतुकास्पद आहे. उंब्रज प्रकरणाचा तपास सुरू असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, अशी ग्वाही यावेळी तहसिलदार सुधाकर भोसले यांनी दिली.