व्यापाऱ्यांचे आंदोलन प्रशासनाने दडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:26 AM2021-07-08T04:26:28+5:302021-07-08T04:26:28+5:30
कऱ्हाड : जिल्ह्यात टाळेबंदीविरोधात तीव्र पडसाद उमटत असतानाच बुधवारी शहरातील काही व्यापाऱ्यांनी एकत्रित येत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन ...
कऱ्हाड : जिल्ह्यात टाळेबंदीविरोधात तीव्र पडसाद उमटत असतानाच बुधवारी शहरातील काही व्यापाऱ्यांनी एकत्रित येत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार व्यापारी दत्त चौकामध्ये जमले. मात्र, प्रशासनाने व्यापाऱ्यांचे हे आंदोलन हाणून पाडले. तसेच दुकाने उघडल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला.
दरम्यान, बाजारपेठेत काहीजण व्यापारी, व्यावसायिकांना दुकाने उघडण्याचे आवाहन करत होते. ही माहिती समजताच पोलीस तातडीने त्याठिकाणी दाखल झाले. व्यापाऱ्यांना आवाहन करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
कोरोना संक्रमण वाढत असल्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण बाजारपेठ प्रशासनाने बंद केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याबाबतचा आदेश दिला आहे. मात्र, या टाळेबंदीला विरोध होत आहे. कऱ्हाडातील काहीजणांनी मंगळवारी सोशल मीडियावर आवाहन करून बुधवारी सकाळी दत्त चौकात उपस्थित राहण्याची हाक व्यापाऱ्यांना दिली होती. त्यानुसार बुधवारी सकाळी काही व्यापारी जमा झाले. व्यापाऱ्यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला. मात्र, पोलिसांनी त्यांना अटकाव केला. त्यावेळी पोलीस आणि व्यापाऱ्यांमध्ये शाब्दीक चकमक झाली. तसेच मलकापूर येथून आलेल्या काही महिला व्यापाऱ्यांनाही पोलिसांनी खडे बोल सुनावत परत जाण्यास भाग पाडले. यावेळी दत्त चौकात चांगलीच गर्दी झाली होती. व्यापाऱ्यांनी दुकाने उघडल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराही यावेळी प्रशासनाने समक्ष व ध्वनीक्षेपकावरुन दिला.
पोलीस उपअधीक्षक रणजित पाटील, पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्यासह पोलीस, पालिका व महसूल विभागाचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
- चौकट
पाच दुकाने सील
शहरातील मुख्य भाजी मंडई परिसरात काही किरकोळ दुकाने सुरु असल्याचे समजताच पालिका व पोलीस प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवली. दिवसभरात पाच ते सहा दुकाने सील करण्यात आली. यावेळी दुकानदार व शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये खटकेही उडाले.
फोटो : ०७ केआरडी ०३
कॅप्शन : कऱ्हाडात व्यापाऱ्यांनी टाळेबंदी झुगारून दुकाने उघडण्याचा प्रयत्न केल्यानंतर बाजारपेठेत कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. (छाया : अरमान मुल्ला)