जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:42 AM2021-01-16T04:42:22+5:302021-01-16T04:42:22+5:30
सातारा : शिरवळ येथील औद्योगिक वसाहतींमध्ये असणाऱ्या कंपन्यांमध्ये स्थानिकांना रोजगार मिळावा या मागणीसाठी स्थानिक भूमिपुत्रांनी पुकारलेला चड्डी-बनियान मोर्चा काढून ...
सातारा : शिरवळ येथील औद्योगिक वसाहतींमध्ये असणाऱ्या कंपन्यांमध्ये स्थानिकांना रोजगार मिळावा या मागणीसाठी स्थानिक भूमिपुत्रांनी पुकारलेला चड्डी-बनियान मोर्चा काढून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. गुरुवारी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी २७ जानेवारी रोजी बैठक घेऊन प्रश्नांची सोडवणूक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
खंडाळा तालुक्यात एकूण ४५३ कंपन्या असून, या कंपन्या स्थानिकांना डावलून बाहेरील युवकांना प्राधान्य देतात. कायम असलेल्या कामगारांना कामावरून काढून टाकणे, कामगारांना नोकरीत कायम न करणे, कंपनीचे रुजू पत्र न देता कामगारांना ठेकेदाराच्या फर्मचे पत्र देणे, यामुळे खंडाळा व शिरवळ या परिसरात बेरोजगारी वाढली आहे. काही ग्रामपंचायत सदस्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे येथील शांततेला गालबोट लागत असल्याची तक्रार भूमिपुत्रांची आहे. या आंदोलकांनी बुधवारी दुपारी भरउन्हात ठिय्या मारून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला सुरुवात केली. दरम्यान, या प्रश्नात शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी यशस्वी शिष्टाई केली. त्यांनी कामगारांची गुरुवारी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आंदोलकांशी चर्चा घडवून आणली. सिंह यांनी कामगारांचा प्रश्न समजावून घेतला. आता दि. २७ जानेवारी रोजी कामगार आयुक्त, कंपन्यांचे मालक आणि आंदोलक कामगार यांच्यात एकत्रित चर्चा घडवून तोडगा काढण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले.