आंदोलकाला पोलिसांकडून मारहाण
By Admin | Published: January 15, 2016 10:31 PM2016-01-15T22:31:43+5:302016-01-16T00:35:57+5:30
चिन्मय कुलकर्णी : आंदोलन चिरडण्यासाठी खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप
सातारा : ‘रिलायन्स इन्फ्रा’ या कंपनीला महामार्गाच्या सहापदरीकरणासाठी दिलेली मुदतवाढ ३१ डिसेंबर रोजी संपली असून, कंपनीविरोधात आंदोलन करू नये म्हणून अधिकाऱ्यांनी आपल्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप संकल्प इंजिनिअरिंग सांस्कृतिक सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चिन्मय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत केला. गुन्हा दाखल झाल्यावर पोलीस अधिकाऱ्यांनी आपणास विनाकारण मारहाण केली असून, संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी आपण पोलीस अधीक्षकांकडे केली आहे, असे ते म्हणाले.
‘रिलायन्स इन्फ्रा’चे अधिकारी राकेश कटारिया यांनी कुलकर्णी यांच्याविरुद्ध दि. ११ रोजी गुन्हा दाखल केला होता. अजिंठा चौकात बोलावून धक्काबुक्की आणि दमदाटी केल्याची तक्रार कुलकर्णींविरुद्ध पोलिसांत करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेऊन रिलायन्स आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाविरुद्ध सुरू असलेले आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचे संकेत दिले. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांसह अनेकांना कुलकर्णी यांनी निवेदन दिले असून, त्यात घडल्या प्रकाराबद्दल माहिती दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक कठाळे आणि उपनिरीक्षक आसवर यांच्यावर कुलकर्णी यांनी मारहाणीचा आरोप केला आहे.
दि. ११ रोजी औद्योगिक वसाहतीतून आपण येत असताना अजंठा चौकात राकेश कटारिया यांची भेट झाली होती; मात्र तेथील क्रॉसिंग कसे धोकादायक आहे, याबद्दल मी त्यांना बोललो होतो, असे कुलकर्णी यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षांपासून ‘रिलायन्स’विरुद्ध आपण तत्त्वाने, नैतिकतेने आणि अहिंसक मार्गाने आंदोलन करीत असल्याचे सांगून निवेदनात ते म्हणतात, ‘राकेश कटारिया यांची खोटी तक्रार घेऊन कर्मचाऱ्यांनी माझ्याविरुद्ध षड्यंत्र रचले. रात्री गुन्हा दाखल होण्यापूर्वी उपनिरीक्षक आसवर यांनी व इतर चौघांनी माझी तक्रार घेण्यास नकार देऊन कटारिया यांच्यासमोर हातावर आणि पायावर मारहाण केली.
तसेच उपोषण व आंदोलन करतोस तर आता जेलमध्ये उपोषण कर, असे म्हणत अश्लील शिवीगाळ केली. दि. १२ रोजी दुपारी एक ते दीडच्या दरम्यान सहायक पोलीस निरीक्षक कठाळे यांनी जेलमधून मला बेड्या घालून शहर पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्यासह सात जणांनी मला हीन वागणूक देऊन अश्लील शिवीगाळ केली. ३० ते ३५ मिनिटे हाता-पायावर व चेहऱ्यावर मारहाण केली. बेड्या घालून १५ मिनिटे रस्त्यावर उभे करून बदनामी केली. तशा अवस्थेत फोटो काढला. जामीनपात्र गुन्हा असूनही रात्रभर जेलमध्ये ठेवले.’
‘यापुढे रिलायन्सविरुद्ध उपोषण, आंदोलन केलेस तर घरात घुसून आई, वडील व भावासह सर्वांना जिवे मारेन,’ अशी धमकी अधिकाऱ्यांनी आपल्याला दिल्याचा आरोप कुलकर्णी यांनी केला. (प्रतिनिधी)
तज्ज्ञांच्या सल्ल्याने पुढील दिशा
अहिंसक मार्गाने कितीही बिकट परिस्थिती आली तरी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार चिन्मय कुलकर्णी यांनी व्यक्त केला. ‘उलट खरा लढा आता सुरू झाला आहे. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन पुढील व्यूहरचना आखणार असून, संविधान आणि न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे,’ असे ते म्हणाले.