जिल्ह्यात १५४.३१ कोटींचे शेती कर्ज थकीत

By admin | Published: June 12, 2017 11:32 PM2017-06-12T23:32:09+5:302017-06-12T23:32:09+5:30

जिल्ह्यात १५४.३१ कोटींचे शेती कर्ज थकीत

The agriculture loan of 154.31 crore was exhausted in the district | जिल्ह्यात १५४.३१ कोटींचे शेती कर्ज थकीत

जिल्ह्यात १५४.३१ कोटींचे शेती कर्ज थकीत

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेसह इतर ३३ बँकांच्या माध्यमातून जिल्ह्यात मार्च २0१७ या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत २ हजार ६८४ कोटी १३ लाख रुपयांचे पीक कर्जाचे वाटप झाले आहे. यापैकी १५४ कोटी ३१ लाखांचे कर्ज थकि आहे. शासनाने घेतलेल्या कर्जमाफीच्या निर्णयामुळे थकबाकीत गेलेल्या कर्जदारांना दिलासा मिळाला आहे. तसेच सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेतला गेल्यास ३ लाख २६ हजार ५९३ शेतकरी कर्जमुक्त होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही महिन्यांपासून कर्जमाफीचा विषय गाजत आहे. राष्ट्रवादी-काँगे्रससह इतर विरोधी पक्षांनी राज्यभर काढलेली संघर्ष यात्रा, सत्तेत सहभागी असतानाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पुणे ते मुंबई अशी काढलेली आत्मक्लेश पदयात्रा, शिवसेनेनेही सरकार पाडण्याचा दिलेला इशारा तसेच शेतकरी आत्महत्येचे सुरु असेलेले सत्र या बाबींमुळे सरकारला कर्जमाफीचा निर्णय घेणे भाग पडले आहे.
दरम्यान, कर्जमाफीची मागणी चहूबाजूंनी वाढू लागल्याने शेती कर्जे थकित गेल्याचा सार्वत्रिक अनुभव जिल्हा मध्यवर्ती बँकांसह पीक कर्ज देणाऱ्या इतर बँकांना अनुभवायला मिळाला. जिल्ह्यामध्ये ३ लाख २६ हजार ५९३ शेतकऱ्यांनी २ हजार ६८४ कोटी १३ लाख इतक्या मोठ्या रकमेची पीक कर्जे घेतली होती. त्यापैकी ५९ हजार १९९ शेतकऱ्यांनी १५४ कोटी ३१ लाखांची थकबाकी ठेवली आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून प्रामुख्याने जिल्ह्यात पीक कर्जाचे वाटप केले जाते.
विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून बँक कर्जवाटप करते, तसेच याच यंत्रणेच्या माध्यमातून ती वसुलही केली जातात. साखर कारखान्यांकडून मिळणारे ऊसाचे पेमेंट जिल्हा बँकांमध्ये जमा होत असते. त्यामुळे साहजिकच कर्जाची वसूली करुन उर्वरित रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होत असते. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेला वसुलीची चिंता सतावत नाही. मात्र, इतर पिकांसाठी दिलेल्या कर्जाची वसुली करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात.
विरोधी पक्षांसह सत्तेत असणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच शिवसेना या दोन्ही पक्षांनी सरकारला हादरे दिल्याने कर्जमाफीच्या निर्णयापर्यंत भाजप सरकारला पोहोचावेच लागले. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता कर्ज भरण्याऐवजी अनेकांनी ती माफ कधी होतील, याकडे डोळे लावले.
जिल्हा बँकेचे दोन महिन्यांत
१५ कोटींची वसुली
कर्जमाफीची चर्चा सुरु झाल्यानंतर काही शेतकरी कर्ज माफीकडे डोळे लावून बसले. एप्रिल व मे या दोन महिन्यांत कर्जाची वसुली ठप्प झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. या दोन महिन्यांत केवळ १५ कोटी रुपयांचे कर्ज वसूल झाले आहे. ५९ हजार १९९ शेतकरी सभासद थकबाकीत गेले.
३७१.३४ कोटींच्या वाटपाचे काय?
बँकांनी १ एप्रिल २0१७ ते ३१ मे २0१७ या कालावधीत १ लाख ५ हजार ३0९ शेतकऱ्यांना ३७१.३४ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. सरकारच्या निर्णयामध्ये या कर्जाचा समावेश असणर का? याबाबत चर्चा सुरु आहे.

Web Title: The agriculture loan of 154.31 crore was exhausted in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.