कृषीमंत्र्यांची अग्रीमची घोषणा; दिवाळीपूर्वी मिळण्याबाबत साशंकता

By नितीन काळेल | Published: October 18, 2023 06:37 PM2023-10-18T18:37:12+5:302023-10-18T18:40:35+5:30

विमा कंपन्यांची उदासीनताच : सातारा जिल्ह्यातील तब्बल ६३ मंडले पात्र 

Agriculture Minister's announcement regarding payment of 25 percent advance amount to farmers for damages, But doubt about it | कृषीमंत्र्यांची अग्रीमची घोषणा; दिवाळीपूर्वी मिळण्याबाबत साशंकता

कृषीमंत्र्यांची अग्रीमची घोषणा; दिवाळीपूर्वी मिळण्याबाबत साशंकता

सातारा : राज्यात खरीपात २१ दिवसांचा पावसाचा खंड पडलेल्या महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना नुकसानीपोटी २५ टक्के अग्रीम रक्कम देण्याबाबत शासनपातळीवर बैठका झाल्या. कृषीमंत्र्यांनीही दिवाळीपूर्वी अग्रीम देण्याची घोषणा केली. मात्र, विमा कंपन्यांकडून विविध कारणे सांगून टाळाटाळ होत आहे. यामुळे दिवाळीपूर्वी अग्रीम रक्कम मिळणार का ? याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. तर यासाठी सातारा जिल्ह्यातील ६३ मंडले पात्र ठरलेली आहेत.  

शेतकऱ्यांना नैसर्गिक संकट, दुष्काळ तसेच अतिवृष्टी आदी काळात मदत होण्यासाठी शासनाच्या वतीने पीक विमा योजना राबविण्यात येते. खरीप आणि रब्बी हंगामातील पिके तसेच फळबागांसाठीही ही योजना आहे. यावर्षीच्या खरीप हंगामापासून राज्य शासनाने शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देऊ केला आहे. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात पीक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांची संख्या पावणे तीन लाखांच्या घरात आहे. पण, खरीप हंगामात पावसाचा खंड पडल्याने राज्यातील शेकडो मंडले नुकसान भरपाईसाठी पात्र ठरत आहेत. त्यातील ६३ मंडले सातारा जिल्ह्यातील आहेत.  

शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यासाठी विविध कारणे आहेत. यामधील एक म्हणजे हंगामात प्रतिकूल परिस्थितीत सलग २१ दिवस पावसाचा खंड राहिल्यास त्या मंडलातील शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम रक्कम मिळते. सातारा जिल्ह्यातील अशा मंडलची संख्या ६३ आहे. यामध्ये कऱ्हाड तालुक्यातील सर्वाधिक १३ मंडले आहेत. यानंतर खटाव तालुक्यातील ९, कोरेगाव ८, फलटण ७, सातारा तालुका ६, वाई, पाटण आणि माण तालुक्यातील प्रत्येकी ५, खंडाळ्यातील ३ आणि जावळीतील २ मंडलांचा समावेश आहे.

सातारा जिल्ह्यातीलच मंडलांची संख्या ६३ असताना राज्यातील आकडा शेकडोच्या घरात आहे. यापार्श्वभूमीवर कंपन्यांकडूनही जोरदार हालचाली सुरू नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री आणि कृषीमंत्र्यांनीही अग्रीम देण्याबाबत सूचना केली. याला १५ दिवस होत आले आहेत. त्यातच कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनीही नगर येथील कार्यक्रमात पात्र शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम रक्कम दिवाळपूर्वी शेतकऱ्यांना मिळेल, अशी घोषणा केली. पण, अजूनही विमा कंपन्याकडून म्हणावा असा प्रतिसाद नाही. त्यामुळे दिवाळीपूर्वी ही रक्कम मिळणार का ? याविषयी साशंकता आहे. 

साताऱ्यात पावणे दोन लाख अर्जधारकांना फायदा..

सातारा जिल्ह्यातील ६३ महसूल मंडलात सलग २१ दिवस किंवा त्याहून अधिक पावसाचा खंड राहिलेला आहे. त्यामुळे या मंडलांतील शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम मिळू शकते. सुमारे १ लाख ७३ हजार एेवढी विमा घेतलेल्या अर्जधारकांची संख्या आहे. तर भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, उडीद, मूग, भुईमूग, सोयाबीन, खरीप कांदा या ९ पिकांसाठी विमा योजना होती.

९ मंडलांनाही मिळू शकतो लाभ..

हंगामात २१ दिवसांपेक्षा कमी पावसाचा खंड असेल पण,५० टक्क्यांपेक्षा अधिक पीक नुकसान असल्यास अशा मंडलातही अग्रीम रक्कम देण्याबाबत शासनस्तरावर हालचाली सुरू आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील आणखी ९ मंडलांना लाभ मिळू शकतो. यामध्ये सातारा तालुक्यातील अपशिंगे, अंबवडे, शेंद्रे, फलटणमधील गिरवी, वाठार निंबाळकर आणि माण तालुक्यातील वरकुटे मलवडी, म्हसवड, शिंगणापूर आणि मार्डी मंडलाचा समावेश आहे.

Web Title: Agriculture Minister's announcement regarding payment of 25 percent advance amount to farmers for damages, But doubt about it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.