धोम-बलकवडी, नीरा-देवघरमुळे कृषीक्रांती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:42 AM2021-01-13T05:42:29+5:302021-01-13T05:42:29+5:30

खंडाळा : खंडाळा तालुका हा कायम दुष्काळी म्हणून गणला जात होता. उन्हाळा जवळ आला की पिण्याच्या पाण्याची टंचाई ही ...

Agriculture revolution due to Dhom-Balkavadi, Nira-Devghar! | धोम-बलकवडी, नीरा-देवघरमुळे कृषीक्रांती!

धोम-बलकवडी, नीरा-देवघरमुळे कृषीक्रांती!

googlenewsNext

खंडाळा : खंडाळा तालुका हा कायम दुष्काळी म्हणून गणला जात होता. उन्हाळा जवळ आला की पिण्याच्या पाण्याची टंचाई ही ठरलेली असायची; मात्र धोम-बलकवडी आणि नीरा-देवघरच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाल्याने दुष्काळाचे सावट दूर होऊन तालुक्याची तहान भागलेली आहे. या प्रकल्पांमुळे कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल झाला असून, शेतीपिकांच्या उत्पादनात वाढ झाली आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकल्पांचे कालवे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले आहेत.

खंडाळा तालुका हा तसा पिढ्यान्‌ पिढ्याचा दुष्काळी तालुका. शेती सिंचनाचा प्रश्न सोडाच; पण पिण्याच्या पाण्याचीही इथं उन्हाळ्यात वानवा व्हायची. पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते; पण डोंगर पोखरून धोम-बलकवडी आणि नीरा-देवघर प्रकल्पाचे पाणी कालव्याद्वारे तालुक्यात पोहोचले. त्यामुळे पाण्यासाठी लोकांची होणारी फरफट थांबली आहे. धोम-बलकवडी प्रकल्पांतर्गत खंडाळा, बावडा, पारगाव, म्हावशी, अहिरे, खेड बुद्रुक, बोरी, पाडळी, निंबोडी, सुखेड यांसह १८ गावे लाभक्षेत्रात आली आहेत तर नीरा-देवघरच्या लाभक्षेत्रात शेखमिरेवाडी, मोर्वे, भादे, अंदोरी, शेडगेवाडी, कराडवाडी, वाघोशी, भोळी यांसह २४ गावे समाविष्ट करण्यात आली आहेत.

या दोन्ही कालव्यांना पाणी वाटप करारानुसार आवर्तने सोडली जातात, त्यामुळे परिसरातील भूजल पातळीत वाढ होत आहे. पारंपरिक सिंचन स्त्रोतामध्ये पाणी क्षमता वाढली आहे. त्याचा फायदा शेतीपिकांच्या सिंचनासाठी होत आहे तसेच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निकालात निघाला आहे. पूर्वी उन्हाळ्याची चाहूल लागताच सर्वत्र पाण्याचे टँकर सुरू करावे लागत होते. पण ही परिस्थिती पूर्णतः बदलली आहे. यावर्षी टँकर सुरू करण्याची वेळ कोणत्याही गावावर येणार नसल्याचे चित्र आहे. पण त्यासाठी दोन्ही कालव्यांना उन्हाळ्याच्या फेब्रुवारी ते मेअखेर चार महिन्यांत किमान दोनवेळा पाणी सोडणे आवश्यक आहे.

तालुक्याच्या पूर्वभागात उन्हाळी पिके पूर्वी घेतली जात नव्हती; परंतु आता पाणी शिवारात खळाळू लागल्याने बहुतांशी जमीन ओलिताखाली आहे. त्यामुळे ऊस, कांदा यासारख्या नगदी पिकांसह फळबागा, भाजीपाला पिकांचे उत्पादन होऊ लागले आहे. त्यामुळे दोन्ही कालवे शेतीसाठी वरदान ठरलेले आहेत.

(चौकट..)

आमदारांकडून सद्य:स्थितीचा आढावा....

धोम-बलकवडी व नीरा-देवघर प्रकल्पाच्या कालव्यांची उर्वरित कामे व पोट पाटांची कामे पूर्ण व्हावीत, तसेच उपसा सिंचन योजनेची कामे सुरू करावीत, यासाठी आमदार मकरंद पाटील यांनी दोन्ही प्रकल्पांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामाचा सद्य:स्थितीचा आढावा घेतला. उर्वरित कामे सुरू करण्यासाठी करावयाच्या तरतुदी याची माहिती घेऊन मंत्रालय स्तरावर प्रयत्न करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे ही कामे लवकरच सुरू होतील, अशी अपेक्षा आहे.

..................................

१२खंडाळा

फोटो - नीरा-देवघरच्या पाण्यामुळे कालवे भरून वाहत आहेत.

Web Title: Agriculture revolution due to Dhom-Balkavadi, Nira-Devghar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.