आदर्शग्राम योजनेअंतर्गत रामराजेंकडून अहिरे गाव दत्तक
By admin | Published: September 20, 2015 08:49 PM2015-09-20T20:49:47+5:302015-09-20T23:44:33+5:30
आदर्श ग्राम योजनेसाठी गावची निवड झाल्याने आनंद आहे. गावची प्रलंबित कामे पूर्ण करण्यास वेग येईल
खंडाळा : महाराष्ट्र शासनाच्या आदर्श ग्राम योजनेंतर्गत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी खंडाळा तालुक्यातील अहिरे गाव दत्तक घेतले आहे. त्यामुळे या गावचा कायापालट होणार असून या निर्णयाचा आनंद गावकऱ्यांनी व्यक्त केला.शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्यावतीने आमदार आदर्श ग्राम योजना सुरू करण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय मे महिन्यात घेण्यात आला होता. रामराजे नाईक-निंबाळकर यांनी या योजनेसाठी अहिरे गावाची निवड केली आहे.
या योजनेतून गावच्या मुलभूत गरजांबरोबर अंतर्गत रस्ते, सुशोभिकरण, प्राथमिक शिक्षणासाठी भौतिक सुविधा, रस्ते विद्युत सोयी, पाणंद रस्ते, आरोग्य सुविधा, शुद्ध व स्वच्छ पिण्याच्या पाण्याची योजना, सांडपाणी व्यवस्थापन व गटार योजना रोजगार मार्गदर्शन केंद्र, ग्रामवाचनालय, जलसंधारणाच्या सोयी, कृषी वाचनालय, व्यायामशाळा, सौर पथदिवे अशा विविध कामांचा आराखडा तयार करण्यात येऊन आदर्शवत गाव व नियोजनात्मक प्रशासन बनविण्यात येणार आहे. यासाठी गावचा सुक्ष्म आराखडा तयार करण्यात येणार आहे. ग्रामस्थांनी या योजनेसाठी सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)
आदर्श ग्राम योजनेसाठी गावची निवड झाल्याने आनंद आहे. गावची प्रलंबित कामे पूर्ण करण्यास वेग येईल. यासाठी ग्रामपंचायत सक्षमपणे कारभार करेल. लोकांच्या मुलभूत सुविधांवर विशेष लक्ष केंद्रीत करणार आहे.
- सुरेखा धायगुडे, सरपंच
अहिरे गावाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी अधिकाधिक कामे पूर्ण करुन गावचा चेहरा बदलला जाईल. यासाठी पंचायत समिती स्तरावरही सहकार्य करू. या योजनेत वास्तववाडी व उल्लेखनीय काम करुन दाखवणार आहे.
- रमेश धायगुडे-पाटील, सभापती