इकडचे दोघं, तिकडचे तिघं पळवतात निधी!

By admin | Published: December 14, 2015 10:24 PM2015-12-14T22:24:45+5:302015-12-15T00:57:28+5:30

पूर्वभागातील नगरसेवकांचा ‘लॉबी’वर हल्लाबोल : ‘अतिशहाण्यां’साठी म्हणे पालिकेचं कामकाज चालतं रात्री नऊपर्यंत -- लोकमत आपल्या प्रभागात

Aikad, both of the funds run away from the funds! | इकडचे दोघं, तिकडचे तिघं पळवतात निधी!

इकडचे दोघं, तिकडचे तिघं पळवतात निधी!

Next

सातारा : वॉर्डात विकासकामं दिसत नाहीत, अशी तक्रार प्रभाग एकमधील नागरिकांनी करताच त्या प्रभागातील नगरसेवकांनी या परिस्थितीमागील एका महत्त्वाच्या कारणाचा सनसनाटी गौप्यस्फोट केला. पालिकेतील सत्ताधारी दोन आघाड्यांपैकी इकडचे दोन तर तिकडचे तीन नगरसेवक जास्तीत जास्त निधी आपापल्या वॉर्डाकडे वळवतात, असं त्यांचं म्हणणं आहे. काही‘अतिशहाण्या’ नगरसेवकांसाठी पालिकेचं कामकाज रात्री नऊपर्यंत चालतं, असा आरोप करून त्यांनी या ‘लॉबी’वर हल्ला चढवला.पालिकेची निवडणूक बारा महिने दूर असताना ‘लोकमत आपल्या प्रभागात’ हा उपक्रम ‘लोकमत’ने सुरू केला आहे. त्या अंतर्गत रविवारी प्रभाग एकमध्ये जाऊन ‘लोकमत चमू’ने नागरिकांच्या भावना, अडचणी जाणून घेतल्या. ‘वॉर्डात नगरसेवक दिसत नाहीत. विकासकामे होत नाहीत. समस्या ऐकणारं कुणी नाही,’ अशी व्यथा नागरिकांनी मांडल्यानंतर या प्रभागातील चार नगरसेवकांना ‘लोकमत’च्या कार्यालयात आमंत्रित करून नागरिकांच्या भावना सांगण्यात आल्या. सुवर्णा पाटील, अलका लोखंडे आणि भाग्यवंत कुंभार हे तिघे उपस्थित होते, तर महेश जगताप परगावी असल्यामुळं त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्यात आला. सुवर्णा पाटील आणि अलका लोखंडे यांनी आक्रमक पवित्रा घेत निधीच्या पळवापळवीचा मुद्दा लावून धरला. ‘आम्ही प्रथमच निवडून आलो; त्यामुळं ‘विद्यार्थी’ होतो. आता आमचा ‘अभ्यास’ झाला आहे,’ असं सांगून त्या म्हणाल्या, ‘पूर्व भागाची करवसुली ८५ टक्के आहे, तर पश्चिम भागाची सरासरी ३५ टक्के आहे. तथापि, सर्वाधिक निधी पश्चिम भागातील वॉर्डमध्ये वळवला जातो. शहराचा समतोल विकास अपेक्षित असताना निधीच्या बाबतीत विषमता योग्य नाही. महिलांना केवळ आरक्षण देऊन भागणार नाही, तर आता महिला प्रतिनिधींना समान निधीही द्यावा लागेल, तरच आम्हाला कामं करता येतील.’
या नगरसेविकांच्या मते, निवडून येताच पहिल्या वर्षी त्यांना पाच लाखांचा वॉर्ड विकास निधी मिळाला. दुसऱ्या वर्षी नगरोत्थान प्रकल्पातील पालिकेचा हिस्सा भरण्यासाठी पूर्ण निधीला कात्री लागली. पण ‘नगरोत्थान’ची कामं प्रभाग एकमध्ये झालीच नाहीत. ती ‘त्यांच्या’च वॉर्डात झाली. तिसऱ्या आणि चौथ्या वर्षी सात-सात लाख निधी मिळाला. पण एक अंतर्गत रस्ता करायचा म्हटलं, तरी सहा लाख खर्च येतो. एवढ्या अल्प निधीत मोठी कामं कशी करणार? दलित वस्ती सुधार प्रकल्पाचा मर्यादित निधी इतर प्रभागांप्रमाणेच याही भागाला मिळाला; पण मागासवर्गीयांसाठी अन्य योजनांचा आलेला भरघोस निधी ‘त्याच’ नगरसेवकांच्या वॉर्डांकडे वळवला गेला. ‘प्रत्येक वॉर्डात दलित वस्ती असताना एकेका वॉर्डात चाळीस-चाळीस लाख निधी जातोच कसा,’ असा सवाल सुवर्णा पाटील यांनी केला. दरम्यान, आपण प्रभागातल्या कामांची वेळोवेळी सादर केलेली यादीच अलका लोखंडे यांनी दाखवली. २७ जानेवारी २०१४, २६ डिसेंबर २०१४ आणि ६ जुलै २०१५ तारखेची ही पत्रं दुर्लक्षिली गेली, असा त्यांचा दावा आहे.
प्रभागरचना बदलल्यामुळं जनसंपर्क आणि कामं घटली का, या प्रश्नाच्या उत्तरादाखल पाटील आणि लोखंडे म्हणाल्या, ‘प्रभाग चार वॉर्डांचा असला, तरी ज्या-त्या नगरसेवकानं आपापल्या वॉर्डात काम करायचं, अशी नेत्यांची सूचना होती. त्यानुसार आम्ही जास्तीत जास्त कामं करण्याचा प्रयत्न केला. परंतु तरीही इतर तीन वॉर्डांशी संपर्क ठेवला.’
दरम्यान, ‘मी जरी एका वॉर्डमधून निवडून आलो असलो, तरी प्रभागाचा नगरसेवक असल्याने इतर तीन वॉर्डमधील नागरिकांशी कायम संपर्क ठेवला. कोणताही भेदभाव न करता त्या वॉर्डमधील कामेही मी केली,’ असं महेश जगताप यांनी दूरध्वनीवरून सांगितलं. (लोकमत चमू)

असे आहेत सनसनाटी आरोप


४सर्व नगरसेवकांची कामं झाली पाहिजेत; पण काही विशिष्ट नगरसेवक परस्पर कारभार करतात. नेतेमंडळीही त्यांच्या कामांना मान्यता देतात.
४पार्टी मीटिंगमध्ये सर्व वॉर्डातील कामांवर चर्चा अपेक्षित आहे. पण एक तर पार्टी मीटिंग होतच नाही आणि झालीच तर हसून आमची टर उडवली जाते.
४आम्ही आमच्या कामांच्या याद्या सादर केल्या तर ‘तुमचे विषय पुढील वेळी’ असं उत्तर मिळतं. आम्ही दिलेले मागण्यांचे कागद पुन्हा सापडतच नाहीत.
४अधिकाऱ्यांनाही ‘वरदहस्त’ असल्यामुळं ते जुमानत नाहीत. आमच्या वाटणीचे पथदिवे मागितले तेव्हा ‘पोहोच करतो’ असं सांगून दिवे पोहोच केलेच नाहीत.
४तीन वर्षांपूर्वी, २०१२ मध्ये आमच्या वॉर्डातील रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे; मात्र तरीही कामं झाली नसल्यामुळं ही मंजुरीही निरर्थक ठरली आहे.
४सफाई, फवारणी अशी कामं अधिकाऱ्यांनी करणं आणि विकास कामे नगरसेवकांनी करणं अपेक्षित आहे. पण तक्रार घेऊन आलेल्यांना आमच्या कडेच पाठवलं जातं.
४अनेक ठिकाणच्या कामांचे आराखडे सदोष आहेत. अशा अशास्त्रीय कामांवर लाखोंचा निधी उधळला गेला. मात्र प्राथमिक कामांसाठी निधी उपलब्ध नाही.
४ठराविक ठेकेदारांना ‘वरदहस्त’ असल्यामुळं त्यांच्या मर्जीनंच कामं चालतात. हे ठेकेदार मनमानी करतात व इतर नगरसेवकांना ‘रिस्पेक्ट’ही देत नाहीत.


जीवन प्राधिकरणावर तोफ
जीवन प्राधिकरणाचं नव्या जलवाहिन्यांचं वर्षानुवर्षे रखडलेलं काम इतर कामांच्या मुळावर आल्याबद्दल नगरसेवकांमध्ये चीड दिसून आली. ‘पूर्व भागातील नागरिकांना प्राधिकरणाचं मासिक बिल भरावं लागतं. परंतु त्यांच्या रखडलेल्या कामांमुळं रस्ते लवकर झाले नाहीत. नागरिकांचा रोष मात्र नगरसेवकांना सहन करावा लागतो. प्राधिकरणाची योजना फोल ठरली, यात नगरसेवकांचा दोष नाही. आधीच निधीची चणचण त्यात प्राधिकरणाचे काम लांबल्याने विकासकामांत खोडा अशी परिस्थिती झाली,’ असं सुवर्णा पाटील आणि अलका लोखंडे यांनी सांगितलं. भाग्यवंत कुंभार यांनी मात्र ‘मी तीन-तीन फूट रुंदीच्या बोळांमध्येही कनेक्शन पोहोचवली आहेत,’ असं सांगितलं.


वॉर्डातल्या कामांविषयी...

Web Title: Aikad, both of the funds run away from the funds!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.