माण तालुक्यात ७० हजार नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:40 AM2021-04-07T04:40:04+5:302021-04-07T04:40:04+5:30
म्हसवड : कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेंतर्गत माण तालुक्यात कोविड लसीकरण मोहिमेच्या चौथ्या टप्प्यास सुरुवात झाली आहे. चौथ्या टप्प्यात माण तालुक्यातील ...
म्हसवड : कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेंतर्गत माण तालुक्यात कोविड लसीकरण मोहिमेच्या चौथ्या टप्प्यास सुरुवात झाली आहे. चौथ्या टप्प्यात माण तालुक्यातील ४५ वर्षांवरील ७० हजार १९८ नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट असून, सोमवारपासून तालुक्यातील ३० आरोग्य उपकेंद्रांवर विशेष लसीकरण मोहीम राबविण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
गेल्या काही दिवसात माण तालुक्यातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आतापर्यंत माण तालुक्यातील एकूण कोरोनाबधितांची संख्या ३५५९ झाली असून, आतापर्यंत ३१६८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तालुक्यातील १२८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या २६३ बाधितांवर उपचार सुरू आहेत.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून माण तालुक्यात जानेवारी महिन्यापासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात अंगणवाडी सेविका, मदतनीस, शिक्षक, शासकीय सेवेतील कर्मचारी हे फ्रंटलाईन वर्कर्स, तर तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील तसेच ४५ ते ६० वर्षांदरम्यान गंभीर आजार असणाऱ्या अशा एकूण ११ हजार ७९३ नागरिकांना लस देण्यात आल्याची माहिती विस्तार अधिकारी प्रशांत सातपुते यांनी दिली.
सध्या १ एप्रिलपासून लसीकरणाच्या चौथ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्यात येणार आहे. माण तालुक्यात ४५ वर्षांवरील नागरिकांची एकूण संख्या ७० हजार १९८ एवढी असून आरोग्य विभागाने १०० टक्के नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवून नियोजन केले आहे.
तालुक्यातील पाच आरोग्य केंद्रे, तसेच ३० उपकेंद्रांवर ५ एप्रिल ते १० मे या कालावधीत लसीकरणाची विशेष मोहीम राबविण्यात येणार असून, यासाठी ७ नोडल अधिकारी व २२५ प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांनी लस घेण्यासाठी गावोगावी ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, प्राथमिक शिक्षक यांच्यामार्फत नोंदणी करून लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात येत आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण कोडलकर यांनी दिली.
चौकट-
१०५ गावांसाठी ३६ केंद्रांवर लसीकरण सुविधा...
लसीकरणाच्या चौथ्या टप्प्यात तालुक्यातील १०५ गावांतील ४५ वर्षांवरील ७० हजार नागरिकांना लस देण्यासाठी ३६ आरोग्य केंद्रांवर लसीकरण सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यामध्ये मार्डी, म्हसवड, पुळकोटी, पळशी, मलवडी प्राथमिक आरोग्य केंद्र, दहिवडी ग्रामीण रुग्णालय, तसेच आंधळी, बिदाल, बिजवडी, कुळकजाई, मोगराळे, वारुगड, शिंदी खुर्द, मार्डी, शिंगणापूर, वावरहिरे, दहिवडी, रानंद, पाचवड, भालवडी, भाटकी, दिवड, हिंगणी, इंजबाव, वडजल, वरकुटे-म्हसवड, गोंदवले बुद्रुक, लोधवडे, महिमानगड, नरवणे, पिंगळी बुद्रुक देवापूर, काळचौंडी, कुकुडवाड, विरळी, वरकुटे-मलवडी या उपकेंद्रांवर लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून, पात्र लाभार्थ्यांना लस घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.