ऐन सुगीत मजुरांची टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:29 AM2021-02-22T04:29:01+5:302021-02-22T04:29:01+5:30
औंध : खटाव तालुक्यात सध्या ज्वारी, गहू, हरभरा, आदी रब्बी पिकांची सगळीकडेच काढणी सुरू झाली असून, शेतकऱ्यांना शेतमजुरांच्या टंचाईस ...
औंध : खटाव तालुक्यात सध्या ज्वारी, गहू, हरभरा, आदी रब्बी पिकांची सगळीकडेच काढणी सुरू झाली असून, शेतकऱ्यांना शेतमजुरांच्या टंचाईस सामोरे जावे लागत आहे. मजुरांचे भाव गगनाला भिडू लागले आहेत. त्यामुळे उत्पादनापेक्षा खर्च अधिक होत आहे. मागील दोन दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने सुगी उरकण्याच्या मार्गावर शेतकरी वर्ग असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे मजुरांची मागणी वाढली आहे. परिणामी टंचाई भासत होती.
गेल्या दोन दशकांमध्ये शेती करण्यासाठी त्या कुटुंबातील चार-पाच सदस्य नेहमी तयार असत. शेतकरी मजूर मिळाले नाही तरी आपल्या शेतातील सुगी तो उरकत असे; पण आता याउलट चित्र दिसून येत आहे. शेतकरी कुटुंबातील एखाद्दुसरा सदस्य शेतात राबताना दिसतो व बाकीची कामे तो शेतमजूर यांच्याकडून करून घेत आहे. ऐन सुगीच्या काळात या मजुरांना सोन्याचा भाव येतो. त्यामुळे मजुरांच्या विनंत्या करता-करता शेतकऱ्यांना घाम फुटू लागला आहे.
गहू, ज्वारी काढण्यासाठी मजुरांची दिवसाची हजेरी ४०० ते ५०० रुपयांच्या आसपास आहे; तर काही मजूर टोळ्या करून ज्वारी उपटून देत आहेत. मात्र त्यांचा एकरी दर हजारोंच्या घरात आहे. ज्वारी उपटल्यानंतर तिची काटणी, मळणी, पेंढ्या बांधणी व गंज लावणे या सर्वांच्या खर्चाचा हिशेब काढला तर ती बाजारातून विकत आणल्यासारखीच आहे. कधी-कधी तर उत्पादनापेक्षा खर्च अधिक येत आहे. त्यामुळे बळिराजा अक्षरशः वैतागला आहे.
(चौकट)
गहू काढण्यासाठी मशीनकडे कल
मजुरांची टंचाई असल्याने सध्या औंध परिसरात गहू काढण्याच्या हार्वेस्टर मशीनकडे शेतकऱ्यांचा कल आहे. एक एकर गहू काढण्यासाठी एका तासाच्या आत वेळ लागत असल्याने अवकाळीच्या फटक्यापासून वाचण्यासाठी व मजुरांच्या कमतरतेमुळे शेतकरी मशीनकडे वळला आहे.
चौकट:-
पैरा पद्धतीवर भर
पैरा ही पद्धत शेतकऱ्यांना परवडणारी आहे. आपली दोन-तीन माणसे व पैरेवाल्यांची दोन-तीन माणसे मिळून आपले काम त्यांनी व त्यांचे काम आपण करायचे; यामुळे खर्चही नाही व कामही आटोपते; परंतु सगळीकडे पैरा चालतो असे नाही. पूर्वी बैलाने शेती करतानासुद्धा मध्यमवर्गीय शेतकरी बैलाचा पैरा करीत असे.
२१औंध
फोटो:-संग्रहित छायाचित्र