वायू प्रदूषणाने नागरिक त्रस्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 12:12 AM2019-06-05T00:12:32+5:302019-06-05T00:12:38+5:30
सातारा : गेली सव्वा वर्ष सुरू असलेले ग्रेड सेपरेटरचे काम आणि भुयारी गटार योजना सातारकरांसाठी उपयुक्त असली तरीही त्यामुळे ...
सातारा : गेली सव्वा वर्ष सुरू असलेले ग्रेड सेपरेटरचे काम आणि भुयारी गटार योजना सातारकरांसाठी उपयुक्त असली तरीही त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या कामामुळे हवेत धूलिकण मिसळून सातारकरांना श्वसनाचे आजार उद्भवत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
सातारा शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत आणि सुखावह व्हावी, या उद्देशाने ग्रेड सेपरेटरचे काम हाती घेण्यात आले. हे काम सुरू असतानाच सर्वत्र भुयारी गटार योजनेचे काम सुरू झाले. या दोन्ही योजना सातारकरांसाठी उपयुक्त असल्या तरीही त्यामुळे अनेक सातारकरांना श्वसनाचे आजार जडले आहेत. दिवसभर शहरात विविध ठिकाणी कामं सुरू असल्यामुळे शहराच्या कुठल्याही टोकावर गेलो तरी धूलिकणांचा त्रास सर्वांना जाणवत आहेच.
वायू प्रदूषणाबरोबरच साताऱ्यातील नैसर्गिक स्त्रोत असलेल्या तळ्यांमधील पाणीही प्रदूषणमुक्त नाही. शहरातील मंगळवार तळे, मोती तळे आणि हत्ती तळे यांची अवस्था प्रदूषणामुळे बिकट झाली आहे. मोती तळ्याने तर प्रदूषणाची सर्व मानके ओलांडली आहेत. त्यामुळे मोती तळं आता धोका पातळीच्या पलीकडे जाऊन पोहोचले आहे.
सातारा शहरातील ड्रेनेजचे पाणी ओढ्यामार्गे वेण्णा नदीला मिसळतं. वेण्णा नदी माहुलीजवळ कृष्णेला मिसळतं. जिथं या दोन्ही नद्यांचा संगम होतो तिथून अगदी ४०० मीटर अंतरावर सातारा शहर व परिसराला पाणी पुरवठा करणारी कृष्णा उद्भव योजना आहे. सगळ्या साताºयाचे ड्रेनेजचे पाणी या संगमात कृष्णा नदीत मिसळतं. तिथून ४०० मीटर अंतरावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे पाणी उपसतं. अगदी जागतिक दर्जाचं जलशुध्दीकरण यंत्रणा इथं बसविण्यात आली तरीही पाण्यात मिसळलेले हे घटक काढणे केवळ अशक्य ठरतं. पाणी पुरवठा योजनापासून थोड्या अंतरावर स्मशानभूमी आहे. येथे येणारे वाहतं पाणी म्हणून मृत व्यक्तीचे कपडे, साहित्य, गादी, चादरी अशा अनेक वस्तू पाण्यात सोडतात.
प्रशासन काय उपाय करतेय?
जल, वायू व ध्वनी प्रदूषण ही सर्वच शहरांपुढील भीषण समस्या बनली आहे. सातारा शहरात प्रामुख्याने ध्वनी व वायू प्रदूषणाचे प्रमाण प्रकर्षाने जाणवते. ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी घरे, कारखाने, वाहने यामधून होणाºया धुराचे उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. सध्या वायू प्रदूषणाचा मुद्दा पालिका प्रशासनाने गांभीर्याने घेतला आहे. सातारा शहरातून दररोज जवळपास सत्तर टन ओला व सुका कचरा संकलित केला जातो. या कचºयाची सोनगाव येथील डेपोत विल्हेवाट लावली जाते. आतापर्यंत अनेकदा डेपोतील कचरा पेटल्याने मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण झाले आहे. हे टाळण्यासाठी पालिकेकडून कचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. हा प्रकल्प अंतिम टप्प्यात असून, येथे कचºयाची वर्गवारी करून विल्हेवाट लावली जाणार आहे. तसेच कचºयापासून खतनिर्मितीवर भर दिला जाणार आहे. पाणी प्रदूषण टाळण्यासाठी देखील प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. पिण्याच्या पाण्यामध्ये जंतुनाशक औषधांचा उपयोग केला जातो. शहरातील पाणी साठवण टाक्यांची वेळोवेळी स्वच्छता केली जाते. सांडपाण्याचे निर्मलून करण्यासाठी पालिकेने भुयारी गटार योजनेचे काम हाती घेतली असून, या योजनेचे कामही प्रगतिपथावर आहे.