जावलीतील ऐतिहासिक वटवृक्षाला हवाय परिसस्पर्श

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:26 AM2021-06-29T04:26:16+5:302021-06-29T04:26:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कुडाळ : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत पाचवडपासून पश्चिमेला जावळी तालुक्यातील वडाचे म्हसवे हे गाव वसले आहे. याठिकाणी ...

Air touch to the historic banyan tree in Jawali | जावलीतील ऐतिहासिक वटवृक्षाला हवाय परिसस्पर्श

जावलीतील ऐतिहासिक वटवृक्षाला हवाय परिसस्पर्श

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कुडाळ : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत पाचवडपासून पश्चिमेला जावळी तालुक्यातील वडाचे म्हसवे हे गाव वसले आहे. याठिकाणी असणाऱ्या ऐतिहासिक प्राचीन वडाच्या महाकाय वटवृक्षामुळे गावचे नाव जागतिकस्तरावर पोहोचले आहे. तालुक्यातील ऐतिहासिक वैराटगडाच्या पायथ्याशी असलेल्या या गावात इतिहासकालीन वटवृक्ष पुरातन काळापासून इतिहासाच्या अनेक पाऊलखुणांची साक्ष देत उभा आहे. निसर्गाचा हा ठेवा जतन होण्यासाठी येथील वटवृक्ष परिसस्पर्श होण्याची वाट पाहत आहे.

जावळीच्या निसर्गसौंदर्याची भुरळ साऱ्यांनाच आहे. याठिकाणच्या अनेक प्राचीन दुर्मीळ वनस्पती, वृक्ष आढळतात. अशातच प्राचीन वटवृक्ष पाहायला मिळणे दुर्मीळच आहे. वडाचे म्हसवे येथे साडेपाच एकर क्षेत्रात या वटवृक्षाचा झालेला विस्तार लक्ष वेधत आहे. आशिया खंडात दुसऱ्या क्रमांकाचा असणारा हा वटवृक्ष सर्वात जुना असून, या झाडाची अनेक ठिकाणी नोंद पाहायला मिळते.

१८८२मध्ये ली वॉर्नर या ब्रिटीश अधिकाऱ्याने सातारा जिल्ह्यातील या वडाच्या झाडाचा उल्लेख केला आहे. १९०३मध्ये पुण्याच्या सायन्स कॉलेजचे प्राचार्य असलेल्या कुक थिओडोर या ब्रिटिशाने पश्‍चिम घाटावरील वृक्षांची नोंद असलेले पुस्तक लिहिलेल्या पुस्तकातही या वृक्षाची नोंद घेतली आहे. कोलकता येथील बोटॅनिक गार्डनमध्ये अशाच प्रकारचा पहिल्या क्रमांकाचा वटवृक्ष असून, म्हसवे येथील वटवृक्ष दुसऱ्या क्रमांकाचा आहे. याचे मूळ झाड काळाच्या ओघात जीर्ण होऊन नष्ट झाले असले, तरी त्याच्या सुमारे शंभर पारंब्यांचे खोडात रूपांतर झालेले आहे. यामुळे सुमारे दोनशे वर्षांहून अधिक काळाचे हे झाड अद्याप तग धरून आहे. या झाडावरील प्राण्यांचे जतन करण्याबरोबरच हा परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याची आवश्‍यकता आहे.

जागतिक वनदिन, पर्यावरण दिन किंवा वट पौर्णिमा या दिवशीच वर्षातून वडाबद्दल अनेकजन भावना व्यक्त करतात. मात्र, आजपर्यंत या वटवृक्षाच्या वाट्याला उपेक्षाच सहन करावी लागली आहे. येथील परिसराचा कायापालट होण्यासाठी आजही येथील वटवृक्ष परिसस्पर्शाची आतुरतेने वाट बघत आहे. निसर्गाचा हा अनमोल ठेवा जावळीच्या भूमीत असून, निसर्गप्रेमी आणि संशोधकांसाठी ही पर्वणीच म्हणावी लागेल. गावाचा मानबिंदू निश्चितच तालुका, जिल्हा आणि राज्याच्या ऐतिहासिक पर्यटनाचा वारसा असून, याच्या रुपांतरातून सातासमुद्रापलीकडे जाईल.

कोट :

निधीची गरज

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्ह्याच्या नियोजन समितीच्या सभेमध्ये याचा पर्यटन स्थळ ‘क’मध्ये समावेश करण्याबाबत तत्वतः मान्यता मिळवली आहे. जावळीच्या माजी सभापती, विद्यमान सदस्य अरुणा शिर्के, येथील ग्रामस्थ, पदाधिकारी, वन विभागाचे अधिकारीही गेल्या काही वर्षांपासून या वटवृक्षाला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळवून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच वन विभागाकडून याबाबत प्रस्ताव, आराखडाही तयार केला आहे. याकरिता निधीची गरज आहे.

- विजय शिर्के, पर्यावरणप्रेमी ग्रामस्थ, म्हसवे

फोटो २८ वडाचे म्हसवे

जावळी तालुक्यातील वडाचे म्हसवे येथील महाकाय वडाचे झाड पर्यावरणप्रेमींचे लक्ष वेधून घेत आहे.

Web Title: Air touch to the historic banyan tree in Jawali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.