अजिंक्यतारा किल्ल्यावरील चंदनाच्या झाडांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 08:51 PM2018-06-15T20:51:31+5:302018-06-15T20:51:31+5:30
जैवविविधतेने नटलेल्या अजिंक्यतारा किल्ल्यावरील वृक्षसंपदा धोक्यात आली आहे. अज्ञातांकडून या किल्ल्यावर असलेली सुमारे दहा वर्षे जुनी चंदनाची झाडे तोडून त्याची चोरी करण्यात आल्याने
सातारा : जैवविविधतेने नटलेल्या अजिंक्यतारा किल्ल्यावरील वृक्षसंपदा धोक्यात आली आहे. अज्ञातांकडून या किल्ल्यावर असलेली सुमारे दहा वर्षे जुनी चंदनाची झाडे तोडून त्याची चोरी करण्यात आल्याने पर्यावरणप्रेमींमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
अजिंक्यतारा किल्ल्यावर सागवान, नीलगिरी, शिसव, चंदन यांसह अनेक औषधी वनस्पती आहे. मात्र, विघ्नसंतोषी व्यक्तींमुळे या झाडांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. वनविभागाच्या दुर्लक्षामुळे या किल्ल्यावरील झाडांची अज्ञातांकडून बेसुमार कत्तल केली जात आहे.
नुकतीच किल्ल्यावर असलेली चंदनाची दोन झाडे अज्ञातांकडून तोडून चोरून नेण्यात आली. किल्ल्यावर फेरफटका मारणाऱ्या चंद्रशेखर गाडगीळ यांना ही बाब नजरेस पडली. यानंतर ही घटना उघडकीस आली. घटनास्थळी सर्वत्र झाडांच्या फांद्या छाटून टाकण्यात आल्या होत्या. किल्यावरील मारुती मंदिर ते वरचा रस्ता यादरम्यान वृक्षतोडीच्या घटनांत वाढ झाली आहे. एकीकडे विविध सामाजिक संघटनांकडून किल्ल्यावर वृक्षारोपण केले जात असताना दुसरीकडे विघ्नसंतोषींकडून वृक्षांची बेमुसार कत्तल केली जात असल्याचे चित्र याठिकाणी पाहावयास मिळत आहे. वनविभागाने याबाबत ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांसह पर्यावरणप्रेमींमधून केली जात आहे.