अजिंक्यतारा बँकेचा विषय पुन्हा ऐरणीवर ! लेखापरीक्षणात गंभीर मुद्दे :
By admin | Published: May 10, 2016 10:35 PM2016-05-10T22:35:26+5:302016-05-11T00:10:28+5:30
संचालकांवर कारवाई करण्याची उपनिबंधकांकडे केली मागणी पस्तीस कोटींचा भ्रष्टाचार : पवार ठेवींची जबाबदारी माझी : शिवेंद्रसिंहराजे
सातारा : ‘येथील अजिंक्यतारा सहकारी बँकेत तब्बल ३५ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून, या भ्रष्टाचाराला जबाबदार असणारे संचालक व तत्कालीन उपनिबंधकाविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे,’ अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. उपनिबंधकांनी कारवाईत चालढकल केल्यास न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
पवार म्हणाले, ‘आठ शाखांचे जाळे असणाऱ्या या बँकेत ५७ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. बँकेने ३.८४ कोटी तोटा दाखविला असून, लेखापरीक्षकाने १६ कोटी रुपयांचा तोटा बँकेला झाला असल्याचे आपल्या लेखापरीक्षण अहवालात म्हटले आहे. बँकेकडून ज्या लोकांनी कर्जे घेतली, तसेच ती फेडली, तरीही त्यांच्यावर कर्जाचा बोजा आहे, असे कर्जदार न्यायालयात गेले आहेत. बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले आहेत. त्यामुळे ठेवीदारांना ठेवीही परत मिळत नाहीत. तसेच ज्यांनी संचालक मंडळाला हाताशी धरून मोठी कर्जे घेतली आहेत, ती आता परतही मिळत नाहीत. या संस्थेचा सन २०१४-१५ चे लेखापरीक्षण राजकिशोर आणि असोसिएटस पुणे यांच्यातर्फे भागीदार सीए यू. बी. साळुंखे यांनी केले आहे. या लेखापरीक्षणात त्यांनी अनेक गंभीर दोष नमूद केले आहेत. बँक तोट्यात गेल्याने लेखापरीक्षकांनी बँकेला वर्ग ‘ड’ दिला आहे. या परिस्थितीत सहकार खात्याकडून बँकेचे चाचणी लेखापरीक्षण होणे आवश्यक असताना तशी कोणतीही नेमणूक अथवा आदेश काढले गेले
नाहीत. ’
अनुत्पादित कर्जाचे प्रमाण वाढल्याबाबत लेखापरीक्षकांनी स्पष्ट केले असले तरी केवळ ५.६ टक्के एवढेच कर्ज अनुत्पादित असल्याचे बँकेने दाखविले आहे. बँकेने तब्बल १२ कोटी ९५ लाख ३१ हजार रुपयांनी तोटा कमी दाखविला आहे. कॅश क्रेडिटच्या बाबतीत मुदत संपून गेली असताना खाते नूतनीकरण न करणे मालसाठा पत्रक दफ्तरी पाहावयास न मिळणे कॅश के्रडिट कर्ज खात्यांना अचल मालमत्ता तारण घेणे ९० दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी व्याज अथवा मुद्दल कर्ज खाती जमा झालेली नाही.
मार्केटयार्ड शाखेमध्ये ४ कोटी ७० लाख रकमेचे कर्ज मार्च महिन्यात वाटप झाले असून, एप्रिल व मे मध्ये कर्ज खाती बंद केली आहेत. अहवालात कालावधीत बँकेने आपल्या एकूण १४६ कर्मचाऱ्यांना ६ कोटी ६४ लाख ५३ हजार ६७ एवढ्या कर्जाचे वाटप केल्याचे दाखविले आहे.
प्रत्यक्षात हे कर्ज वाटप केले गेले नाही. हे कर्ज केवळ अनुत्पादित कर्ज कमी करण्यासाठी दाखविले आहे. वास्तविक पाहता हे कर्ज वाटप ही गंभीर बाब असून, त्याबाबत लेखापरीक्षक यांनी आपल्या अहवालात याबाबत काहीही नमूद केलेले नाही. (प्रतिनिधी)
सातारा : ‘थकबाकी वाढल्याने अजिंक्यतारा सहकारी बँकेवर निर्बंध घातले आहेत. निर्बंधामुळे ठेवीदारांची मोठी गैरसोय आणि अडचण होत आहे. याची जाणीव मला आहे. मात्र, कर्ज वसुली पूर्ण क्षमतेने सुरू असून, ज्या ठेवीदारांना खूपच गरज आहे, अशांना मी स्वत: मदत करत आहे. ठेवी परत करण्याची जबाबदारी माझी आहे. दीपक पवार यांनी दुसऱ्याकडे बोट दाखविण्यापेक्षा चार लोकहिताची कामे करावीत,’ असा खोचक सल्ला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सर्व ठेवीदारांच्या ठेवी लवकरात लवकर परत देण्यासाठी आणि बँक एका सक्षम बँकेत विलीनीकरण करून ठेवीदारांचे व्यवहार पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. ज्या-ज्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले. त्या संस्थांमधील ठेवीदारांना त्यांची रक्कम परत मिळाली आहे का? माझ्यावर गुन्हा दाखल करून ठेवीदांचे पैसे आठ-दहा दिवसांत मिळणार आहेत का? केवळ राजकीय द्वेशापोटी बँकेच्या विलीनीकरणाची अंतिम टप्प्यात आलेली प्रक्रिया बंद पाडून ठेवीदारांना अडचणीत आणायचे का? याचाही विचार ठेवीदारांचा राजकीय कळवळा आलेल्या पवारांनी केला पाहिजे. आजही मी माझ्या भूमिकेवर ठाम असून, ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी आणि बँकेच्या विलीनीकरणासाठी मी कटिबद्धआहे.
दुसऱ्यांवर आरोप करण्यापेक्षा दीपक पवारांनी आधी राजेश्वर युवक बँकेतील गौडबंगाल उघड करावे. राज्य आणि केंद्रात सत्ता असूनही जावळीत जनाधार, पाठिंबा मिळत नसल्याने पवार वैफल्यग्रस्त झाले आहेत. भाजपाचे वारे असतानाही एजंटगिरीसाठी प्रसिद्ध असलेल्या पवारांना जनेतेने पराभवच दाखवला. विधानसभेला झालेला पराभव अजूनही पवारांना पचवता आला नसल्याने राजकीय सुडापोटी ते आमच्यावर आरोप करत आहेत. हे जनतेलाही माहिती
आहे. दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा पवारांनी चार-दोन लोकहिताची कामे करावीत.
मी कधीही माझी जबाबदारी नाकारली नाही आणि यापुढेही नाकारणार नाही. त्यामुळेच बँकेचे ठेवीदार माझ्यावर विश्वास ठेवून मला सहकार्य करत आहेत. त्यांच्या विश्वासाला कदापी तडा जाणार नाही, याची मी खात्री दिली आहे. ठेवीदारांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी वसुलीसह बँकेच्या विलीनीकरणाला प्राधान्य दिले असून यासंदर्भात सकारात्मक चर्चाही चालू आहे. स्वत:च्या राजेश्वर युवक बँकेचे काय झाले? या बँकेच्या माध्यमातून किती लोकांचे हित साधले? हेही पवारांनी एकदा जाहीर करावे. आमच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणाऱ्या पवारांनी ‘राजेश्वर युवक’चे गौडबंगाल जाहीर करून स्वत:वरही गुन्हा दाखल करण्याची जाहीर मागणी केली पाहिजे, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले. (प्रतिनिधी)