किल्ले अजिंक्यतारा आता झटपट सर होणार!, किल्ला पालिकेत समाविष्ठ झाल्याने विकासाचा मार्गही मोकळा
By सचिन काकडे | Published: December 19, 2023 06:52 PM2023-12-19T18:52:52+5:302023-12-19T18:53:07+5:30
किल्ले अजिंक्यतारा साताऱ्याचं वैभव
सातारा : कित्येक वर्षांपासून डागडुजीच्या प्रतीक्षेत असलेल्या किल्ले अजिंक्यताऱ्यावरील रस्ता काँक्रिटीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. पालिकेकडून रुंदीकरणासह काँक्रिटीकरण करण्यात आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी प्रशस्त झाला आहे. दर्जेदार रस्त्यामुळे दुर्गप्रेमी पर्यटकांसह सातारकरांना या किल्ल्यावर आता पटकन जाता येणार आहे.
किल्ले अजिंक्यतारा पूर्वी पालिकेच्या हद्दीत नव्हता. त्यामुळे पालिका प्रशासनाला किल्ल्यावर कोणतेही काम करताना अनेक मर्यादा येत होत्या. अखेर सप्टेंबर २०२० मध्ये शहराची हद्दवाढ झाली, किल्ला पालिकेत समाविष्ठ झाला अन् त्याच्या विकासाचा मार्गही मोकळा झाला. किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर कित्येक वर्ष डांबर पडले नव्हते. पावसामुळे रस्त्याची अवस्था इतकी दयनीय झाली होती की त्यावरुन वाहन चालविणे दूर चालणेही कठीण बनले होते.
त्यामुळे पालिका प्रशासनाने सर्व नैसर्गिक आपत्ती व भविष्याचा वेध घेत रस्त्याचे डांबरीकरण करण्याऐवजी काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला. या कामासाठी जिल्हा नियोजनमधून चार कोटी तर पर्यटन विकासमधून पाच कोटींचा निधी मंजूर झाला. किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापासून काँकिटीकरणास प्रारंभ करण्यात आला, हे काम आता पायथ्याशी असलेल्या मंगळाई देवी मंदिराजवळ आले आहे. येत्या काही दिवसांत ते पूर्णत्वास येणार असून, स्थानिक नागरिकांसह पर्यटकांची परवडही आता थांबणार आहे.
मराठा साम्राज्याची चौथी राजधानी..
- किल्ले अजिंक्यताऱ्याला मराठा साम्राज्याच्या चौथ्या राजधानीचा मान मिळाला असून, या किल्ल्यावर आजही इतिहासाच्या पाऊलखुणा आढळून येतात.
- सोळा एकरात विस्तीर्ण पसरलेल्या या किल्ल्यावर मुख्य दरवाजा, दक्षिण दरवाजा, मंगळाई देवी व मारुतीचे मंदिर, सात तळी, राजसदर, वाड्याचे अवशेष पहायला मिळतात.
- किल्ल्याचा मुख्य बुरूज व तटबंदीची पडझड झाली असून, पुरातत्व विभागाने त्याची वेळीच डागडुजी करावी, अशी इतिहासप्रेमींची अपेक्षा आहे.
किल्ले अजिंक्यतारा साताऱ्याचं वैभव आहे. हे वैभव जपण्यासाठी पालिका प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. सध्या काँक्रिटीकरणाचे काम प्रगतीपथावर असून, दरीच्या बाजूला संरक्षक भिंत देखील बांधण्यात आली आहे. पुढील टप्प्यात किल्ल्यावर व्ह्युविंग गॅलरी, पर्यटक व नागरिकांसाठी आसन व्यवस्था केली जाणार आहे. - अभिजित बापट, मुख्याधिकारी