'अजिंक्यतारा' लखलखला! मशाल महोत्सवात पारंपरिक वाद्यं अन् शिवगर्जनांनी आसमंत दणाणला!

By सचिन काकडे | Updated: February 18, 2025 23:44 IST2025-02-18T23:43:48+5:302025-02-18T23:44:31+5:30

सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातील शिवभक्तांनी किल्ल्यावर लावली हजेरी

Ajinkyatara lightened up resounded with traditional instruments and the roar of hails of Chhatrapati Shivaji Maharaj at Mashal Mahotsav at Satara | 'अजिंक्यतारा' लखलखला! मशाल महोत्सवात पारंपरिक वाद्यं अन् शिवगर्जनांनी आसमंत दणाणला!

'अजिंक्यतारा' लखलखला! मशाल महोत्सवात पारंपरिक वाद्यं अन् शिवगर्जनांनी आसमंत दणाणला!

लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा : अवकाशात फडकणारे भगवे ध्वज, ढोल-ताशांचा निनाद, हलगीचा कडकडाट, तेजोमय मशालींनी उजळून गेलेली तटबंदी अन् अंगावर शहारे आणणाऱ्या शिवगर्जना, अशा उत्साही वातावरणात किल्ले अजिंक्यताऱ्यावर मंगळवारी रात्री मशाल महोत्सव साजरा करण्यात आला. हा पारंपरिक सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातील शिवभक्तांनी किल्ल्यावर हजेरी लावली.

सातारा शहरात दरवर्षी शिवजयंती सोहळा मोठ्या धामधुमीत साजरा केला जातो. यंदादेखील शिवजयंती महोत्सव समिती राजधानी सातारा यांच्या वतीने दि. १७ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत शिवजयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (दि. १७) शाहू कलामंदिरात देशातील पहिले ‘शिव साहित्य संमेलन’ पार पडले. यानंतर स्वराज्याचे शिलेदार, थोरली मसलत ही व्याख्याने शिवशाहिरांचे पोवाडे, छत्रपतींची युद्धनीती, छत्रपतींचे दुर्गवैभव, अफजल खान वध, असे कार्यक्रम पार पडले. तर मंगळवारी (दि.१८) किल्ले अजिंक्यताऱ्यावर मशाल महोत्सव दिमाखात साजरा करण्यात आला.

प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गडपूजन करण्यात आले. यानंतर तुतारीचा निनाद व हलगीच्या कडकडाटात सर्व मावळे राजसदरेवर आले. याठिकाणी मान्यवरांचा सत्कार व मनोगत व्यक्त करण्यात आले. यानंतर मशाल महोत्सवास प्रारंभ झाला. यावेळी पारंपरिक वाद्यांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली, तसेच छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी... जय शिवाजी, हर हर महादेव, अशा गगनभेदी घोषणाही देण्यात आल्या. किल्ल्याची तटबंदी मशालींच्या लखलखाटाने उजळून निघाली. या साेहळ्याला माजी पक्षप्रतोद अमोल मोहिते, राजू गोरे, धनंजय जांभळे, विकास गोसावी, हर्षल चिकने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

किल्ल्यावर अवतरला शिवकाल

शिवजयंती उत्सव समितीकडून या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली होती. किल्ले अजिंक्यताऱ्याचे मुख्य प्रवेशद्वार व बुरुजाला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. जागोजागी फुलांची रांगोळी काढण्यात आली होती. डोळे दीपणारी विद्युत रोषणाई, फेटेधारी मावळे, मशालींचा लखलखाट अन् मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके पाहून किल्ल्यावर शिवकाल अवतरल्याची प्रचिती आली.

Web Title: Ajinkyatara lightened up resounded with traditional instruments and the roar of hails of Chhatrapati Shivaji Maharaj at Mashal Mahotsav at Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.