आमदार मकरंद पाटील यांच्यासह अजित पवार गटाने घेतली शरद पवारांची भेट, सातारा जिल्ह्यात जोरदार चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 12:35 PM2023-11-17T12:35:36+5:302023-11-17T12:36:57+5:30
दोघांमध्ये सुमारे पाऊणतास विविध विषयांवर चर्चा
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, की नवीन नेतृत्व अजित पवार यांच्या गटात सामील होण्याच्या निर्णयाबाबत द्विधा मन:स्थिती झालेल्या आमदार मकरंद पाटील यांच्यासह सहकाऱ्यांनी प्रथम शरद पवार आणि नंतर अजित पवार, असा प्रवास केला. मात्र, दरवर्षीप्रमाणे गोविंद बागेत शरद पवारांच्या भेटीसाठी सर्वांनी उपस्थिती लावल्याने जिल्ह्यात सध्या ही भेट चर्चेचा विषय झाला आहे. मकरंद पाटील पुन्हा शरद पवार गटात येणार की काय, अशी आता चर्चा सुरू आहे.
आमदार मकरंद पाटील आणि सहकाऱ्यांना राष्ट्रवादीतील कोणत्या नेत्यासोबत जायचे, हा निर्णय अगतिकतेने घ्यावा लागला असला तरी तो मतदारसंघ आणि ताब्यातील सहकारी संस्थांच्या भवितव्याचा विचार करून घ्यावा लागला आहे. त्यामुळे शरद पवारांवर त्यांचे प्रेम आहेच. नुकत्याच किसन वीर साखर कारखान्याच्या गाळप हंगाम शुभारंभाच्या भाषणात त्यांनी आम्ही शरद पवारांशी निष्ठा ठेवून आहोतच.
मी घेतलेली भूमिका माझ्या मतदारसंघातील काही सहकाऱ्यांना आवडली नाही; परंतु साखर कारखाना आणि मोठा मतदारसंघाच्या विकास कामांसाठी निर्णय घेतला. त्याचवेळी आमदार पाटील यांनी राजकीय तडजोडी आणि शरद पवार यांच्याशी असलेल्या निष्ठेबाबत भाष्य करून आपली भूमिका स्पष्ट केली होती. तरीही शरद पवार निष्ठावंतांशी वेगवेगळी चर्चा आ. पाटील यांच्या मतदारसंघात करत होते. त्यामुळे या भेटीने जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
या भेटीत शरद पवार यांनी आवर्जून किसन वीर कारखाना व खंडाळा कारखान्यांचे गाळप सुरू झाले का, काही अडचणी आहेत का, याची माहिती मकरंद पाटील यांच्याकडून घेतली. दरवर्षी दिवाळी पाडव्यादिवशी शरद पवार यांची भेट घेण्यासाठी कार्यकर्ते येत असतात. आमदार मकरंद पाटील दरवर्षी तिथे हजेरी लावत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतरही बहुतांशी आमदारांनी पाडव्यादिवशी शरद पवार यांची भेट घेतली.
आमदार मकरंद पाटील आणि दोघांमध्ये सुमारे पाऊणतास विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे पाटील, शामराव गाडवे, मुंबई बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब सोळसकर हे उपस्थित होते.