अजित पवार जिल्ह्यात तळ ठोकून
By admin | Published: November 18, 2016 11:26 PM2016-11-18T23:26:29+5:302016-11-18T23:26:29+5:30
निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष
सातारा/कुडाळ : सांगली-सातारा विधान परिषदेसाठी शनिवारी मतदान होत आहे. मतदानापूर्वी रणनीती ठरविण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी जिल्ह्यात तळ ठोकून होते. तसेच डॉ. पतंगराव कदम गटाचे प्रमुख कार्यकर्तेही जिल्ह्यात ठिकठिकाणी मोर्चे बांधण्यात दंग होते.
सांगली-सातारा विधान परिषदेसाठी शनिवारी होत असलेल्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. काँग्रेसचे माजी मंत्री पतंगराव कदम यांचे बंधू मोहनराव कदम यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून शेखर गोरे निवडणूक रिंगणात आहेत.
या निवडणुकीकडे आमदार अजित पवार यांनी वैयक्तिक लक्ष दिले आहे. त्यातच जिल्ह्यातील आठ नगरपालिका आणि सहा नगरपंचायतींसाठी निवडणूक लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी शुक्रवारी दुपारी अचानक मेढा येथे भेट दिली. ते राष्ट्रवादीच्या संपर्क कार्यालयात आल्याचे समजल्यानंतर मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले.
राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष अमित कदम यांच्याकडून पवार यांनी परिस्थितीची माहिती जाणून घेतली. यावेळी वसंतराव मानकुमरे उपस्थित होते. उमेदवारांशी औपचारिक चर्चा केली. मेढ्यातील धावती भेट आटोपून अजित पवार महाबळेश्वरकडे रवाना झाले. त्यापूर्वीच जिल्'ातील पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य, नगरपालिकांचे सदस्य, राष्ट्रवादीचे सर्व आमदार व मुख्य पदाधिकारी महाबळेश्वरात दाखल झाले होते.
महाबळेश्वरमध्ये गुप्त बैठक
महाबळेश्वर : येथील एका हॉटेलमध्ये सातारा आणि सांगली जिल्'ांतील राष्ट्रवादीचे बहुतांश आमदार व लोकप्रतिनिधींची अजित पवार यांनी गोपनीय बैठक घेतली. विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आ. जयंत पाटील, आ. शशिकांत शिंदे आणि आ. सुमन आर. पाटील यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांची बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या बैठकीत सांगली-सातारा विधान परिषद मतदानाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. ही निवडणूक राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची आहे. कोणाच्याही भूलथापांना तसेच आमिषाला राष्ट्रवादीच्या मतदारांनी बळी पडायचे नाही, परीक्षेच्या काळात राष्ट्रवादीला दगाफटका होईल, अशी वातावरण होऊ न देण्याचे आवाहन त्यांनी या बैठकीत केले.