अजित पवारांच्या बोलण्याला काडीची किंमत नाही : पडळकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:43 AM2021-08-24T04:43:18+5:302021-08-24T04:43:18+5:30
कऱ्हाड : बैलगाडी शर्यती सुरू झाल्या नाहीत तर नाव सांगणार नाही, असे अजित पवार म्हटले होते, पण अजून ...
कऱ्हाड :
बैलगाडी शर्यती सुरू झाल्या नाहीत तर नाव सांगणार नाही, असे अजित पवार म्हटले होते, पण अजून सुरू झालेल्या नाहीत. त्या सुरू व्हायला हव्यात म्हणून आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्यावरून जर अजित पवार टीका करीत असतील तर ते काय बोलतात त्याला काडीचीही किंमत नाही असे म्हणत आमदार पडळकरांनी महाविकास आघाडी सरकार हे मुघलांच्या वृत्तीचे आहे, अशी टीका केली, तर बैलगाडी शर्यती सुरू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे पडळकर म्हणाले.
पडळकर यांनी सोमवारी कऱ्हाड येथील बैलगाडा शर्यतीबाबत संघटनांची बैठक घेतली. त्यांनी बैलगाडा शर्यत संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली व माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बैलगाडी संघटनेचे पदाधिकारी धनाजी शिंदे, पैलवान आनंदराव मोहिते, सचिन नलवडे आदी उपस्थित होते.
पडळकर म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार बैलगाडा शर्यतीबाबत जे काही बोलत आहेत, त्यांनी जी काही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी वक्तव्ये केली आहेत त्याला काडीचीही किंमत नाही. हा राजकारणाचा मुद्दा नाही. त्यांची भाषणे पहावी. वास्तविक पाहता या सरकारला बैलगाडा शर्यतीतले आंदोलन मोडून काढायचे होते. मात्र, त्यामध्ये ते यशस्वी झाले नाहीत. शेतकऱ्यांना वीस वीस किलोमीटर बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी फिरावे लागत आहे. त्याचा आम्हाला अभिमान आहे.
मराठा आरक्षणाबाबत बोलताना पडळकर म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबत कोर्टात राज्य सरकारनेच वकील नेमला होता. सरकार आमच्याकडे कागदपत्र देत नाही. म्हणून आम्ही मराठा आरक्षणाबाबत योग्य मत मांडू शकलो नाही, असे ते सांगत आहेत. ओबीसी आरक्षणाबाबत पंधरा महिने झाले. अजून निर्णय नसल्याचेही पडळकरांनी सांगितले.