अजितदादांचे ‘च’ कोण-कोण ?

By admin | Published: September 7, 2014 10:12 PM2014-09-07T22:12:45+5:302014-09-07T23:25:06+5:30

कार्यकर्त्यांना स्पष्ट संकेत : ‘माण-खटाव’ अन् ‘कऱ्हाड दक्षिण’मध्ये नव्या समिकरणाची नांदी

Ajitad's 'Ch' angle? | अजितदादांचे ‘च’ कोण-कोण ?

अजितदादांचे ‘च’ कोण-कोण ?

Next

प्रमोद सुकरे -कऱ्हाड -हणबरवाडीच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ‘जिल्ह्यात आपल्याच विचाराचे आमदार असले पाहिजेत,’ असे कार्यकर्त्यांना स्पष्ट संकेत दिले़ आठ पैकी सहा मतदार संघात तसे सध्या राष्ट्रवादीचेच आमदार आहेत़ पैकी चौघांच्या उमेदवारी आज दादांनीच जाहीर केली़; त्यामुळे माण-खटाव अन् कऱ्हाड दक्षिणेत ‘आपल्याच’ या शब्दातील दादांचे ‘च’ कोण-कोण असतील, याची चर्चा सध्या रंगू लागली आहे़
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून जिल्ह्याने अपवाद वगळता घड्याळालाच पसंती दिली आहे़ आजही चार विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे तर दोन ठिकाणी सहयोगी आमदार आहेत़ तेथे राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार निश्चित आहेत; पण माण खटावला काँग्रेसच्या गोरेंनी ‘जय हो’ चा नारा दिलाय, तर दक्षिणेतून स्वत: मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण इच्छुक आहेत़
त्यामुळे अजित पवारांच्या कानमंत्रानुसार या दोन मतदारसंघातून कोण-कोण उभे राहू शकते, हे पाहणे गरजेचे आहे़ माण-खटावमधून माजी आमदार सदाशिव पोळ व जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत. दोघांनीही तयारी चालवलीय खरी; पण आघाडी झाल्यास ही जागा काँग्रेसकडे जाणार, हे निश्चित़ मग ‘च’चा कानमंत्र अनिल भाऊ की पोळ तात्या यांच्यापैकी कुणाला लागू होणार, हे पहावे लागणार आहे़
काही दिवसापूर्वी माजी मंत्री रामराजे निंबाळकरांनीही एका कार्यक्रमात व्यासपीठावर सदाशिव पोळांना ‘आता बसू नका, उभेच रहा’ असे सूचक वक्तव्य केले होते़, हे ही विसरून चालणार नाही़
कऱ्हाड दक्षिण मतदार संघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे़ आमदार विलासराव पाटील - उंडाळकर सध्या याचे प्रतिनिधित्व करतात, ते पुन्हा रिंंगणात उतरण्यासाठी सज्ज आहेत़; पण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी दक्षिणेतून लढण्याचे संकेत दिल्याने पक्षांतर्गतच गोंधळ वाढला आहे़ मुख्यमंत्री ‘बाबा’ अन उपमुख्यमंत्री ‘दादा’ यांच्यातील सख्य अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे़ त्यामुळे दादांच्या ‘च’ चा प्रयोग येथेही होल शकतो बरं !
पालिकेतील लोकशाही आघाडीचे अध्यक्ष अन आमदार बंधू सुभाष पाटील यांनी दक्षिणसाठी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे़ कऱ्हाड शहरासह उत्तरेतील १५ गावांचा समावेश दक्षिण मतदार संघात झाल्याने दादांनी बाळासाहेबांना सांगितल्यास सुभाष पाटील ‘बाशिंग’ बांधू शकतात़
शिवाय राजेश पाटील-वाठारकर तर आहेतच ! मोठ्या पवारांच्या आदेशानुसार दिवंगत विलासराव पाटील-वाठारकर दक्षिणेतून
तीनदा लढले होते़, हा इतिहास
आहे़ आता छोट्या पवारांच्या ‘च’ वरून छोटे वाठारकरही प्रसंगी दक्षिणेतून लढू शकतात़ फक्त
दादांचा आदेश‘च’ यायला हवा
बस्स !
विमानतळावरही ‘च’चीच भाषा.. !
उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईला रवाना होण्यासाठी कऱ्हाडच्या विमानतळावर पोहोचले. त्यावेळी त्यांच्यासोबत काही प्रमुख कार्यकर्तेही होते. त्यावेळी पाठीमागे न पाहताही दादांनी कार्यकर्त्यांना सल्ला दिला. ‘मी जातो, आता तुम्ही काय करायचं ते बघा. मी निवडून येतोयच; पण येथेही आपल्याच विचाराची माणस निवडून आणा,’ असे दादा म्हणाले.
खरं तर कऱ्हाड दक्षिणमध्ये सध्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात उभे राहण्यासाठी अतुल भोसले हेच तगडे उमेदवार समजले जाताहेत; पण ‘डॉक्टरबाबांना गतवेळी उत्तरेत आपण कसे पराजित केले,’ याची कबुली अजितदादांनी आज चक्क जाहीर कार्यक्रमात देऊन टाकल्याने ते नक्कीच ‘च’ होऊ शकत नाही.

Web Title: Ajitad's 'Ch' angle?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.