अखाद्य बर्फाला मिळाला निळा रंग! ग्राहकांची काळजी : १ जूनपासून अंमलबजावणी; अन्न औषध प्रशासन कारवाईसाठी सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 11:53 PM2018-05-11T23:53:38+5:302018-05-11T23:53:38+5:30
सातारा : ग्राहकांना अन्न पदार्थ विक्री करताना त्यासाठी वापरण्यात आलेला बर्फ औद्योगिक वापराचा असल्याचे निदर्शनास आले आहे.
प्रगती जाधव-पाटील ।
सातारा : ग्राहकांना अन्न पदार्थ विक्री करताना त्यासाठी वापरण्यात आलेला बर्फ औद्योगिक वापराचा असल्याचे निदर्शनास आले आहे. असा हा अखाद्य बर्फ खाणं ग्राहकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. हे लक्षात आल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने अखाद्य बर्फाचा रंग निळा करण्याच्या सूचना केल्या आहेत. याची अंमलबजावणी १ जूनपासून होणार आहे.
राज्यात बर्फाचे उत्पादन करताना खाद्य दर्जाच्या बर्फात कुठलाही रंग टाकू नये व अखाद्य बर्फात अन्न सुरक्षा व मानके कायद्यात नमूद केलेला व खाद्योपयोगासाठी वापरण्यात येणारा रंग अत्यल्प प्रमाणात निळसर रंगांची छटा निर्माण होईल, असे वापरण्याचे निर्देश आहेत. निर्देशानुसार किमान १० पीपीएक खाद्यरंग टाकणे आवश्यक आहे. खाद्य पदार्थात वापरण्यात येणारा बर्फ, बर्फ उत्पादक, साठा, वितरण, वाहतूक व विक्री यावर अन्न व औषध प्रशासन नियमानुसार कारवाई होईल. उत्पादकांनी खाद्यरंगाचा वापर केला नाही तर खाद्यबर्फ समजून त्याला अधिनियमाच्या कार्यकक्षेत समजला जाईल, असेही अध्यादेशात नमूद केले आहे.
बर्फाच्या लादीत आढळला चक्क कोळी ..
सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात लिंबू सरबत आणि गोळ्याच्या गाड्यावर व्यावसायिक अजित काळे यांना बर्फाच्या लादीत आत अडकलेला कोळी दिसला. त्यांनी तातडीने याचे छायाचित्र ‘लोकमत’ला पाठविले. याविषयी त्यांनी संबंधित व्यावसायिकाला विचारल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन ‘ऐसा तो चलता है’ म्हणत वेळ मारून नेली. पण अनेकदा बर्फात असे काही आढळले तर तेवढा तुकडा बर्फ आधी वापरून संपविण्याचा फंडा व्यावसायिक वापरतात, असे या व्यापाऱ्याने गप्पांच्या ओघात सांगिंतले.
बर्फाला रंग कशासाठी?
पिण्यायोग्य पाण्यापासून तयार करण्यात आलेला बर्फ, खाद्य बर्फ हा अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार ‘अन्न’या परिभाषेत मोडतो. खाद्य बर्फ व अखाद्य बर्फ हा सर्वसामान्यापणे पिण्यायोग्य पाण्यापासून तयार केलेला नसल्याने त्याचे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात. यावर तोडगा काढण्यासाठी अखाद्य बर्फ अधोरेखित करण्यासाठी त्याला निळा रंग करण्याचे निर्देशित करण्यात आले आहे.