अक्षदाच्या धाडसामुळे अनेकांच्या घरातून दूर झाला अंधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 11:59 PM2019-08-24T23:59:20+5:302019-08-25T00:00:07+5:30
वीज म्हटलं की खरंतर अंगावर काटा उभा राहतो, मग ती आकाशात कडाडणारी असो किंवा आपल्या रोजच्या वापरातील असो. सर्वसामान्य नागरिक विजेच्या खांबाखाली उभं राहताना देखील घाबरतो; पण अशा विजेच्या खांबावर, ३० फूट उंचीवर लीलया चढून काम करणारी तरुणी पाहिली की तोंडात बोट जातात.
आनंद गाडगीळ ।
मेढा : गेल्या काही दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यात मुरळधार पाऊस पडला. यात जावळी तालुक्यातील वीज खांब वाकले होते. तर काही ठिकाणी विजेच्या तारा तुटल्याने अनेक गावांमधील वीज गेल्याने अंधार पडला होता. महावितरण कंपनीपुढे वीजपुरवठा सुरळीत करण्याचे मोठे आव्हान होते. अशावेळी दापवडी येथील अक्षदा रांजणे ही ३० फूट उंच खांबावर चढून वीजपुरवठा पूर्ववत करण्याचा प्रयत्न करीत होती. तिची जिद्द आणि धाडसीपणा पाहून सध्या चर्चेचा विषय बनली आहे.
वीज म्हटलं की खरंतर अंगावर काटा उभा राहतो, मग ती आकाशात कडाडणारी असो किंवा आपल्या रोजच्या वापरातील असो. सर्वसामान्य नागरिक विजेच्या खांबाखाली उभं राहताना देखील घाबरतो; पण अशा विजेच्या खांबावर, ३० फूट उंचीवर लीलया चढून काम करणारी तरुणी पाहिली की तोंडात बोट जातात. जावळी तालुक्यातील दापवडी गावची अक्षदा नथुराम रांजणे ही युवती सध्या जावळी तालुक्यात चर्चेचा विषय बनली आहे.
वीजवितरण कंपनीच्या करहर शाखेत काम वीजतंत्री म्हणून काम करणाºया अक्षदा हिचे धाडस हे महिला कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत हेच दाखवते. वीजवितरण कंपनीत आज अनेक महिला नोकरी करताहेत; पण ते काम चार भिंतीच्या आतील; मात्र प्रत्यक्ष फिल्ड वर्क करताना, वायरमन म्हणून काम करताना महिला दिसणं हे मात्र कठीणच. मात्र, अक्षदा रांजणे मागील तीन वर्षांपासून खांबावर चढून वीज दुरुस्तीचे काम करीत आहे. अतिवृष्टीच्या काळामध्ये तिने जलदगतीने खांबांची दुरुस्ती करून अनेकांच्या घरातील अंधार दूर केला.
शेतकरी कुटुंबात जन्मलेली अक्षदा हिने घरचे काम, शेतीचे काम करीत शिक्षण पूर्ण केले. २०१८ मध्ये वीज वितरण कंपनीच्या करहर शाखेत तिने शिकाऊ उमेदवार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर ती काम करीत असताना आॅफिसमधील कामात तिचे मन रमेना, तिने सहकारी वायरमन यांच्याबरोबर फिल्डवर जाण्यास सुरुवात केली. खांबावर चढून दुरुस्ती करण्याचे काम केल्याने तिचातील आत्मविश्वास दुणावला अन् ३० फूट उंचीवर लीलया चढून ती काम करू लागली.
लहानपणापासून मला आयुष्यात काहीतरी वेगळं व चांगलं करायचं ठरवलं होते. ज्या क्षेत्रात महिला काम करायला घाबरतात, अशा क्षेत्रात मला काम करण्याची संधी मिळाली. त्यासाठी सुरुवातीपासून आई, वडील, भाऊ, आयटीआयमधील शिक्षकांच्या मार्गदर्शनाबरोबरच कार्यालयातील अधिकारी, सहकारी यांचे देखील प्रोत्साहन मिळाले. त्यामुळे सध्या महावितरणमध्ये करीत असलेल्या वीजतंत्री कामामुळे एक वेगळाच समाधान मिळत आहे.
-अक्षदा रांजणे,
वीजतंत्री महावितरण
जावली तालुक्यात दापवडी येथील अक्षदा रांजणे महावितरणा च्या ३० फुटी उंच खांबावर लिलया चढून दुरुस्तीची कामे पाहते.