मित्रांना सांगूनच अक्षयने केले होते विषप्राशन...
By admin | Published: January 26, 2015 12:44 AM2015-01-26T00:44:40+5:302015-01-26T00:45:17+5:30
वादही झाला : मित्रांनी पेनाने टोचले म्हणून संताप, शाळेतून तडक घरी परतला
सातारा : आईच्या भेटीसाठी व्याकूळ झालेला आणि मुळातच ‘शॉर्ट टेम्परड’ असणारा अक्षय चव्हाण याला शनिवारी शाळेत काही मित्रांनी पेनाने टोचले आणि तो आणखी भडकला. यावेळी मित्रांशी त्याचा थोडाफार किरकोळ वादही झाला. परिणामी तो आणखी चिडला. संतापलेल्या अक्षयने शाळा अर्ध्यातूनच टाकून तडक घराकडे जाण्याचा निर्णय घेतला. मित्रांनी त्याला अडविले; मात्र तो कोणाचे ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. ‘मी आता औषध घेणारच आणि जीव संपवणार,’ असा निर्णयच त्याने येथे जाहीर केला. तो तडक घराकडे आला आणि येथेच त्याने उंदीर मारण्यासाठी ठेवलेले औषध पाण्यात मिश्रण करून प्यायला. मात्र, अक्षयचे शिक्षक संजय वीरकर आणि अनिकेत बोराटे विद्यार्थी मित्राने दाखविलेल्या तत्परतेमुळे त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात यश आले.
अक्षय चव्हाण हा बारा वर्षीय विद्यार्थी त्रिपुटी येथील एका शाळेत सातवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. आईची भेट होत नसल्याचे कारणाने व्याकूळ होऊन शनिवारी त्याने सकाळी उंदीर मारण्याचे औषध पाण्यात मिश्रण करून प्यायला. यामुळे त्याला उलट्या झाल्या. त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचे प्राण वाचले. आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.
अक्षयचे वडील हयात नाहीत. आजोबा शिवाजी ब्रह्मानंद चव्हाण (वय ७०) आणि आजी फुलाबाई (वय ६५) त्याचा सांभाळ करत आहेत. अक्षयची आई मात्र, महाड येथे मोलमजुरी करते. तिने तिच्यासमवेत आपल्या थोरल्या मुलाला ठेवले आहे. अक्षयदेखील तिच्याकडेच होता. मात्र, येथे तो शाळेत जात नव्हता. परिणामी गेल्यावर्षी त्याला त्याच्या आजोबांनी महाड येथून त्रिपुटीत आणले आणि शाळेत टाकले. सुरुवातीच्या काळात काही वाचायलाही न येणारा अक्षय मात्र, दोन वर्षांत इतका तयार झाला की खो-खो आणि कबड्डीतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्याने नाव मिळविले. तो गृहपाठातही तत्परता दाखवू लागल्याने तो शाळेतील शिक्षकांचा आवडता बनला. मात्र, तत्काळ संतापणे ही त्याची सवय कायमचीच होती. त्याची प्रचिती शनिवारी अनेकांना आली.
रविवारी तो जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होता. त्याला आत्महत्येचा मनात विचार का आला, अशी विचारणा केली तर अक्षय त्यावर काही फारसा बोलला नाही. मात्र, त्याचे आजोबा शिवाजी आणि आजी फुलाबाई यांचा चेहरा रडवेला झाला होता. २००५ मध्ये अक्षयच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर तो काही दिवस महाडला आईकडे राहिला. मात्र, आता तो आजी-आजोबांकडे आहे.
झाडावर बसून अक्षय पाहत होता...
अक्षयचे आजोबा शिवाजी चव्हाण त्याला नेहमी शाळेत जाण्यासाठी आग्रह करायचे; मात्र अक्षयला अनेकदा शाळेत जायचा कंटाळा यायचा. अक्षय शाळेत जात नसल्याचे पाहून आजोबांनी त्याला मारहाणही केली. मात्र, सारखा-सारखा आग्रह होत असल्याचे पाहून अक्षय एकदा घरातून पळून गेल्याची आठवण आजोबांनी सांगितली. अक्षयला गावातील अनेक मंडळी शोधत होती. कदाचित तो आपल्या आईकडे महाड येथे गेला असावा म्हणून आजोबा तिकडे गेले. मात्र, अक्षय तेथेही नव्हता. अक्षय मात्र हा संपूर्ण प्रकार गावातील एका झाडावर बसून पाहत होता, अशी आठवणही त्याची आजी आणि शिक्षकाने यावेळी सांगितली.
बाळा पुन्हा असे करू नकोस
जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचे आजी, आजोबा अतिशय घाबरले होते. मात्र, त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे पाहून ‘बाळा, पुन्हा कधी असे करू नकोस,’ असे रडतच्या त्याच्यापुढे विनंती करत होते. ‘तुझी आई आता दोन दिवसांनी त्रिपुटीला येणार आहे. त्यामुळे तू आता तिच्यासाठी व्याकूळ होऊ नकोस,’ असेही आजी-आजोबा अक्षयला सांगत होते.