वाढती रुग्णसंख्या खटावकरांसाठी धोक्याची घंटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:39 AM2021-04-27T04:39:03+5:302021-04-27T04:39:03+5:30
खटाव : गतवर्षीच्या तुलनेत यंदा कोरोनाचे तांडव सर्वांनाच भयभीत करत आहे. खटावमध्ये रुग्णवाढीमुळे ग्रामस्थांमधून भीती व्यक्त होत आहे. ग्रामपंचायतस्तरावरही ...
खटाव : गतवर्षीच्या तुलनेत यंदा कोरोनाचे तांडव सर्वांनाच भयभीत करत आहे. खटावमध्ये रुग्णवाढीमुळे ग्रामस्थांमधून भीती व्यक्त होत आहे. ग्रामपंचायतस्तरावरही कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. खटावकरांच्यादृष्टीने ही धोक्याची घंटा असून, कोरोना रोखण्यासाठी पुन्हा आरोग्य, पोलीस, कोरोना योद्धे कामाला लागले आहेत.
खटावमध्ये हॉटस्पॉट बनू लागलेल्या काही प्रभागांमध्ये आरोग्य विभागाकडून आरोग्य कर्मचाऱ्यांसोबतच आशा व अंगणवाडी सेविका यांची पथके घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत आहेत. ज्या घरात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत, त्यांची तसेच त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींसह संपर्कातील व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यासाठी त्यांना कोरोना सेंटरमध्ये पाठविण्यात येत आहे.
मध्यंतरी काही दिवस मंदावलेला कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. शासनाने कडक निर्बंध व कडक नियमावली जाहीर केली तरीही काही महाभाग विनामास्कचे ‘मला काय होतंय’, म्हणून रस्त्यावर विनाकारण फिरत आहेत. त्यांच्यावर कुटुंबातील अन्य सदस्यांनी बंधन घालण्याची गरज आहे. अशा व्यक्तींवर कठोर करवाई करण्याची वेळ आता आली आहे.
कोरोनाची सध्याची परिस्थिती ही आणीबाणीची आहे. झपाट्याने वाढणारा कोरोनाचा संसर्ग थांबविणे प्रत्येकाच्या हातात आहे. परंतु, तरुणाईकडून बेफिकीरपणे सुरू असलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असताना, पोलीस प्रशासनावर तसेच आरोग्य यंत्रणेवर अधिक ताण आहे. सध्या कोरोना सेंटर भरली आहेत. त्यामुळे गृह अलगीकरणामध्ये असणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वच गावांमध्ये अधिक आहे. दरम्यान, गृह अलगीकरणात असलेल्यांकडूनच कोरोनाचा प्रसार होत आहे. गृह अलगीकरणातील लोकच सध्या कोरोनाचे वाहक बनले आहेत.
ग्रामपंचायत, आरोग्य कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, दक्षता कमिटी सदस्य तसेच गावातील मंडळांनी एकत्र येऊन गाव सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी घेऊन प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्याची वेळ आली आहे. गावात अनेक रुग्ण सर्दी, ताप, खोकल्याने ग्रस्त आहेत. तरीही औषध विक्रेत्यांकडे जाऊन औषध घेऊन घरीच उपचार घेऊन गावभर फिरत आहेत. गृह अलगीकरणात असणाऱ्या तसेच हाय रिस्कमधील व्यक्तीच्या हातावर शिक्के मारण्याची गरज आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होईल.
कॅप्शन :
खटावमध्ये वाढत्या रुग्णवाढीला आळा घालण्यासाठी आता पुन्हा एकदा आशा व अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन तपासणी करत आहेत. (छाया : नम्रता भोसले)