‘काळूबाईच्या नावानं चांगभलं’चा गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 11:02 PM2018-01-02T23:02:06+5:302018-01-02T23:02:57+5:30

The alarm of 'Kalu Bai's Name' | ‘काळूबाईच्या नावानं चांगभलं’चा गजर

‘काळूबाईच्या नावानं चांगभलं’चा गजर

googlenewsNext


पसरणी : महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मांढरदेव येथील काळेश्वरी देवीच्या यात्रेला उत्साहात प्रारंभ झाला. ‘काळूबाईच्या नावानं चांगभलं’च्या गजरात मंगळवारी मांढरगड दुमदुमुन गेला. मंगळवारी सुमारे दोन लाख भाविकांनी देवीचं दर्शन घेतले. तर जिल्हा न्यायाधीशांच्या हस्ते देवीची महापूजा करण्यात आली. त्यावेळी रांगेतील बाजीराव चौधरी व त्यांची पत्नी सुभद्रा चौधरी (रा. किवळे, ता. खेड, जि. पुणे) या दाम्पत्याला देवीच्या महापूजेला उपस्थित राहण्याचा मान मिळाला.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध यात्रेपैकी एक असेलेली काळेश्वरी देवीची यात्रा महिनाभर चालते. शाकंभरी पोर्णिमा हा यात्रेचा मुख्य दिवस असतो. यादिवशी देवीची विधिवत महापूजा केली जाते. त्यामुळे मंगळवारी पहाटे देवस्थानचे अध्यक्ष तथा मुख्य जिल्हा न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. यावेळी देवस्थानचे विश्वस्त उपस्थित होते. कडाक्याची थंडी असतानाही भाविक सोमवारपासून गडावर यायला सुरुवात झाली होती. मध्यरात्रीपासून हजारो भाविक रांगेत उभे राहिले होते. महाद्वाराजवळ चरण दर्शन रांग, छबिना दर्शन रांग व मुख दर्शन रांग अशा स्वतंत्र रांगा करण्यात आल्या होत्या. पहाटे महापूजा झाल्यावर देवीच्या दर्शनासाठी भाविकांना मंदिर खुले करण्यात आले.
दर्शनानंतर परतीच्या मार्गाने भाविकांना पोलिस खाली पाठवत होते. दुपारी बारापर्यंत भाविकांची संख्या हजारात होती. मात्र, बारानंतर भाविकांची संख्या वाढत गेली. सुमारे दोन किलोमीटर रांगा लागल्या होत्या. मंदिरापासून तीन किलोमीटर अंतरावर प्रशासनाच्या वतीने एसटी व खासगी वाहनांसाठी स्वतंत्र वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली होती. भाविक देवीचा गजर करत डोक्यावर देव्हारे घेऊन मंदिराकडे येत होते. मंदिर परिसरात नारळ फोडणे, नैवद्य ठेवणे, तेल वाहने, वाद्य वाजवणे यावर पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे मंदिर परिसरात सुरळीत व शांततेत दर्शन घेतले जात होते. दिवसभरात दोन लाख भाविकांनी देवीचे दर्शन घेतले.
वाईमार्गे मांढरदेव घाटातून तर आंबावडेमार्गे भोर घाटातून मोठ्या प्रमाणात वाहने गडावर येत होती. दोन्ही घाटांत वाहनांच्या लांबच रांगा लागल्या होत्या. वाई व भोर पोलिसांच्या वतीने दोन्ही घाटांत वाहतूक सुरळीत करण्यासाठी कर्मचारी तैनात करण्यात आले होते. तसेच क्रेनची व्यवस्था करण्यात आली होती. वाई एमआयडीसी, कोचळेवाडी व आंबवडे येथे चेक पोस्ट करण्यात आले आहे. पोलिस प्रत्येक वाहनाची तपासणी करून सोडत होते. गडावर पोलिस व उत्पादन शुल्क विभागाची स्वतंत्र पथके लक्ष ठेवून आहेत. वन विभागही सतर्क असून, गडावर कोणीही खिळे ठोकू नये, यासाठी गस्त घालण्यात येत आहे.
मंदिर परिसर व यात्रा मार्गावर ठिकठिकाणी आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत. मंदिर परिसरात आपत्कालीन यंत्रणा सज्ज असून, महाद्वाराजवळ रुग्णवाहिका, अग्निशामक बंब ठेवण्यात आले आहेत. अनिरुद्ध बापू डिजास्टर मॅनेजमेंटचे स्वयंसेवक यात्रा मार्गावर ठिकठिकाणी असून, कुठे गर्दी होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहेत. वाई व भोर आगाराच्या वतीने जादा बसेस सोडण्यात आल्याने भाविकांची मोठी सोय झाली आहे.
आज उत्तर यात्रा...
देवस्थानच्या वतीने भाविकांसाठी प्रसाद म्हणून लाडू देण्यात येत आहे. मुंबईच्या प्रसाद कालेकर या भाविकाने विविध पुष्पाच्या माध्यमातून मंदिराची सजावट केली आहे. वाई पोलिसांच्या वतीने गडावर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. चोरट्यावर लक्ष ठेवण्यासाठी साध्या वेशातील पोलिस गडावर कार्यरत आहेत. अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार यांनी मांढरदेवला भेट देऊन माहिती घेतली. पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विनायक वेताळ व त्यांची टीम गडावर तैनात आहे. दंगा काबू पथक, गुन्हे शाखेचे पथकही गडावर आहे. दरम्यान, मांढरदेव येथील उत्तर यात्रा बुधवारी होत आहे.

Web Title: The alarm of 'Kalu Bai's Name'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.