औंधच्या जोतिबाच्या यात्रेत चांगभलंचा गजर

By admin | Published: April 17, 2017 01:09 PM2017-04-17T13:09:48+5:302017-04-17T13:09:48+5:30

दर्शनासाठी भाविकांची गर्दी, मानाच्या सासनकाठ्या नाचवून पालखी मिरवणूक

The alarms in the Jyotiba yatra of Aundh | औंधच्या जोतिबाच्या यात्रेत चांगभलंचा गजर

औंधच्या जोतिबाच्या यात्रेत चांगभलंचा गजर

Next

आॅनलाईन लोकमत

औंध (जि. सातारा), दि. १७ : औंधसह परिसरातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा जोतिबाची यात्रा मंगळवारी उत्साहात पार पडली. गुलाल-खोबऱ्याची उधळण अन जोतिबाच्या नावानं चांगभलंचा जयघोष करून मानाच्या सासनकाठ्या नाचवून पालखी मिरवणूक काढण्यात आली.

अनेक दशकांपासून येथील उत्तरेकडील डोंगरावरील जोतिबाच्या मंदिर परिसरात चैत्रामध्ये हा यात्रोत्सव साजरा केला जातो. ती परंपरा आजही सुरू आहे. सोमवारी सायंकाळी येथील कुंभारवाड्यातील श्रींच्या मूतीर्चे पूजन करून कुंभार समाज बांधव व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये पालखीत प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर छबिना काढण्यात आला. यानंतर श्री यमाईदेवी मंदिर, होळीचा टेक, मारुती मंदिर, हायस्कूल चौकमार्गे श्रींची मूर्ती जोतिबा डोंगरावर नेण्यात आली. मंगळवारी पहाटे जोतिबाच्या मूर्तीस महाअभिषेक घालण्यात आला. मंत्रपुष्पांजली, महाआरती आदी कार्यक्रम यावेळी पार पडले.

पौरोहित्यपठण वरूडच्या ब्राह्मणवृंदांनी केले. त्यानंतर अश्वारूढ रूपामध्ये जोतिबाची पूजा बांधण्यात आली.
डोंगरावरील काशीविश्वनाथ व कालभैरवनाथ या देवतांचे विधिवत पूजन झाल्यानंतर औंधसह परिसरातील वरूड, जायगाव, भोसरे, अंभेरी, कोकराळे, नांदोशी, खबालवाडी, त्रिमली, करांडेवाडी, खरशिंगे, येळीव या गावांतील भाविकांनी जोतिबाचे दर्शन घेतले. त्यानंतर दुपारी श्रींच्या उत्सवमूतीर्चे पूजन करून पालखीमध्ये प्रतिष्ठापना करण्यात आल्यानंतर जोतिबाच्या नावाचा जयघोष करून फटाके वाजवून पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मंदिरास पाच प्रदक्षिणा घालण्यात आल्या. भाविकांना प्रसाद, फळांचे वाटप करण्यात आले.

रात्री श्रींची मूर्ती पालखीतून नागोबा मंदिर येथे विसाव्यासाठी आणण्यात आली. त्यानंतर पालखी मिरवणूक काढून कुंभारवाड्यातील मंदिरामध्ये मूळस्थानी उत्सवमूतीर्ची स्थापना करण्यात आली व उत्सव, यात्रोत्सवाची सांगता करण्यात आली. उत्सव पार पाडण्यासाठी कुंभार समाज व औंध ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)

Web Title: The alarms in the Jyotiba yatra of Aundh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.