लहान मुलांना सर्रास विकली जातेय दारू!
By admin | Published: March 23, 2015 11:04 PM2015-03-23T23:04:25+5:302015-03-24T00:17:48+5:30
नियम धाब्यावर : देशी-विदेशी दुकानदारांचे पितळ ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमुळे उघडे
सातारा : कोवळ्या वयातील मुलांना दारू विकण्यास कायद्याने प्रतिबंध असला, तरी पैसे मिळताच वाईन शॉपमधून मुलांच्या हाती सर्रास बाटली ठेवली जाते, हे कटू वास्तव ‘लोकमत’ने सोमवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून समोर आले आहे. हाच ‘उदार’ दृष्टिकोन कायम राहिल्यास लहानगे जीव व्यसनाधीन होण्याचा धोका निर्माण झाला आहे.सातारच्या तांदूळ आळीमध्ये शनिवारी (दि. २१) ऐन गुढीपाडव्याला आठ-दहा वर्षांची मुले दारूच्या नशेत झिंगल्याचे नागरिकांना पाहायला मिळाले होते. नागरिकांनी त्यांचे मुंडण केले होते. कागदावर शेंगदाणे-फुटाणे घेऊन ही मुले झिंगत बसली होती. त्यांना दुकानातून दारू मिळालीच कशी, असा प्रश्न उपस्थित झाला होता. या पार्श्वभूमीवर सातारा आणि कऱ्हाड शहरांत एकाच वेळी हे स्टिंग आॅपरेशन करण्यात आले. या मोहिमेमध्ये काही लहानग्यांनी निडर होऊन ‘लोकमत’ला साथ दिली. दोन्ही शहरांमध्ये एखादा अपवाद वगळता लहान मुलांच्या हाती बाटली ठेवताना विक्रेत्यांना काहीच वाटले नाही. एखाद्या ठिकाणी ‘कुणासाठी पाहिजे,’ एवढाच प्रश्न विचारण्यात आला. परंतु, नोट पुढे करताच दारू दिली गेली. या मोहिमेत देशी आणि विदेशी दारूच्या दुकानांमध्ये आठ ते सोळा वर्षे वयोगटातील मुलांना पाठविण्यात आले. काही लहानग्यांना तर ‘ब्रॅण्ड’ही लक्षात राहत नव्हते. त्यांचे चाचपडणे पाहून त्यांना ‘नाव लिहून आणा,’ असे सांगितले गेले.
नियमानुसार एकवीस वर्षांची अट
तंबाखूजन्य पदार्थांची विक्री अठरा वर्षांखालील मुलांना करता येत नाही. दारूच्या बाबतीत हा नियम एकवीस वर्षांचा आहे. काही वर्षांपूर्वी दारू पिण्याचा परवाना देण्याचे वय एकवीसवरून एकोणीस करावे, असा घाट घातला गेला होता. परंतु, तसा नियम होऊ शकला नाही. आजही दारू पिण्यासाठी परवाना अनिवार्य तसेच एकवीस वर्षांच्या आतील मुलांना दारू द्यायची नाही, असा नियम आहे. परंतु, या नियमाची सर्रास पायमल्ली होत असल्याचे ‘लोकमत टीम’ला आढळून आले.