उच्च दाबाच्या टॉवरवर मद्यपीचा ‘हाय व्होल्टेज ड्रामा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:45 AM2021-08-20T04:45:37+5:302021-08-20T04:45:37+5:30

कोयनानगर : कोयना भागातील दास्तान गावाच्या शेजारील उच्चदाबाच्या वीज वाहिनी टॉवरवर करिप्पा तुकाराम कंटेकर (वय ४५, रा. शंभरगी, ता. ...

Alcoholic 'High Voltage Drama' on High Pressure Tower | उच्च दाबाच्या टॉवरवर मद्यपीचा ‘हाय व्होल्टेज ड्रामा’

उच्च दाबाच्या टॉवरवर मद्यपीचा ‘हाय व्होल्टेज ड्रामा’

Next

कोयनानगर : कोयना भागातील दास्तान गावाच्या शेजारील उच्चदाबाच्या वीज वाहिनी टॉवरवर करिप्पा तुकाराम कंटेकर (वय ४५, रा. शंभरगी, ता. अथणी, जि. बेळगाव) ही व्यक्ती बुधवारी सायंकाळी सहा वाजता चढल्याने खळबळ उडाली. तब्बल दहा तास टॉवरवर चाललेला त्याचा ‘ड्रामा’ अखेर गुरुवारी पहाटे साडेचार वाजता संपला. ‘रेस्क्यू टीम’ने रात्रभर केलेल्या प्रयत्नानंतर पहाटे त्या व्यक्तीला टॉवरवरून सुखरूप खाली उतरविण्यात यश आले.

बेळगाव जिल्ह्यातील अथणी येथील करिप्पा कंटेकर याला त्याचे दोन नातेवाईक बुधवारी सायंकाळी दास्तान विभागातील एका मठावर दारू सोडण्यासाठी घेऊन आले होते. करिप्पा दारूच्या नशेत असल्यामुळे सैरावैरा पळत तो सायंकाळी सहा वाजता दास्तान येथील एका शेतातील टॉवरवर चढला. सुरुवातीला त्याला नातेवाइकांनी विनंती केल्या. मात्र, तो खाली आला नाही. ही माहिती ग्रामस्थांना व कोयना पोलीस स्टेशनला मिळताच सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत माळी तत्काळ घटनास्थळी पोहोचले. वाढलेली गर्दी पाहून करिप्पाने प्रवाह चालू असलेल्या टॉवरवर सुमारे पन्नास फूट अंतरावर खाली वर करत स्टंट सुरू केला. घटनेचे गांभीर्य ओळखून सहायक पोलीस निरीक्षक माळी यांनी महापारेषण व इतर प्रशासनाला याची माहिती देत ४४० व्होल्ट एवढ्या उच्चदाबाची वीज वाहिनी रात्री ८.४५ मिनिटांनी बंद केली. त्यानंतर पाटण व कऱ्हाड येथील अग्निशामक दलाच्या साहित्याच्या मदतीने महापारेषणचे अजिंक्य पवार, प्रशांत नांगरे व टीमने दोनवेळा प्रयत्न केला. मात्र, करिप्पा टॉवरच्या अगदी शेवटच्या टोकाला जाऊन बसला. त्याचा तोल गेला तर जिवावर बेतू शकते, हे ओळखून त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न थांबविण्यात आला. रात्री उशिरा सातारा येथील छत्रपती शिवेंद्रराजे भोसले ‘रेस्क्यू टीम’ला पाचारण करण्यात आले. त्यांनी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सेफ्टी बेल्ट व इतर साधनांच्या साह्याने टॉवरवर चढून करिप्पाला खाली उतवले. या टीममधे चंद्रसेन पवार, देवा गुरव, गणेश निपाणे, सिद्धार्थ गायकवाड आदी सहभागी होते.

करिप्पा कंटेकर याला कोयना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्यावर गुन्हा नोंद करीत त्याला अटक करण्यात आली आहे. हवालदार चव्हाण तपास करीत आहेत.

- चौकट

अधिकाऱ्यांनी पावसात रात्र जागून काढली

या थरार नाट्यामुळे पाटणचे तहसीलदार योगेश टोम्पे, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित पाटील, पाटण पोलीस ठाण्याचे निरीक्षक एन. आर. चौखंडे, कोयना पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत माळी, विद्युत पारेषणचे अजिंक्य पवार, प्रशांत नांगरे, उत्तम पाटील यांच्यासह अग्निशामक दलाने रिमझिम पावसात रात्र जागून काढली.

- चौकट

महावितरणला ७० लाखांचा झटका

या घटनेमुळे तब्बल नऊ तास वीज प्रवाह खंडित करण्यात आला होता. त्यामध्ये महावितरणचे ६० ते ७० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

फोटो : १९केआरडी०४

कॅप्शन : दास्तान, ता. पाटण येथील उच्च दाबाच्या टॉवरवर बुधवारी रात्री करिप्पा कंटेकर ही व्यक्ती चढल्याने खळबळ उडाली होती. (छाया : नीलेश साळुंखे)

फोटो : १९केआरडी०५

कॅप्शन : टॉवरवरून खाली उतरविल्यानंतर करिप्पा कंटेकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

Web Title: Alcoholic 'High Voltage Drama' on High Pressure Tower

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.