साताऱ्यात अलिशान हॉटेल बनले जुगाराचा अड्डा..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 06:05 PM2020-08-01T18:05:11+5:302020-08-01T18:06:28+5:30
सातारा : लॉकडाऊनमुळे बंद असलेले साताऱ्यातील हॉटेल मराठा पॅलेसमध्ये चक्क जुगार अड्डा सुरू असल्याचे उघडकीस आले. शहर पोलिसांच्या गुन्हे ...
सातारा : लॉकडाऊनमुळे बंद असलेले साताऱ्यातील हॉटेल मराठा पॅलेसमध्ये चक्क जुगार अड्डा सुरू असल्याचे उघडकीस आले. शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने या हॉटेलवर छापा टाकून दहा जणांना ताब्यात घेतले. या छाप्यात पोलिसांनी १ लाख ३८ हजार रुपये रोख व इतर साहित्य असा सुमारे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
संजय लेवे, किरण लेवे, स्वप्नील काकडे, हेमंत चव्हाण, उमर मोमीन, समीर शेख, इम्तियाज सय्यद, अमोल चौगुले, संजय शिंदे, ओंकार शिंदे (सर्व रा. सातारा शहर परिसर) अशी पोलिसांनी ताब्यात घेतल्याची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेले अधिक माहिती अशी, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असून, हॉटेल सुरू ठेवण्यास बंदी आहे. असे असतानाही शहरातील हॉटेल मराठा पॅलेसमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
शहर पोलिसांच्या डीबीने पोलिसांचे पथक तयार केले. गुरुवारी रात्री आठच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांनी छापा टाकल्याचे संशयितांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी आधीच नाकाबंदी केली होती.
पोलिसांना हॉटेलमध्ये जुगार सुरू असल्याचे आढळून आले. यानंतर पोलिसांना रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, दुचाकी ताब्यात घेतली. यावेळी १ लाख ३८ हजारांची रोकड, मोबाईल, जुगाराचे साहित्य पोलिसांनी जप्त केले.
पोलिसांनी सर्व संशयितांना ताब्यात घेऊन त्यांना पोलीस ठाण्यात आणले. संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबीचे फौजदार नानासाहेब कदम, पोलीस हवालदार अविनाश चव्हाण, शिवाजी भिसे, प्रशांत शेवाळे, अभय साबळे, गणेश घाडगे, किशोर तारळकर, संतोष कचरे यांनी कारवाईत सहभाग घेतला.