कोरोना रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचा राहणार सक्रिय सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:38 AM2021-04-17T04:38:51+5:302021-04-17T04:38:51+5:30
सातारा : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढतच चालले असल्याने जिल्हा परिषदेचे सर्व विभाग आता पूर्ण तयारीनिशी या लढ्यात उतरले आहेत. ...
सातारा : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढतच चालले असल्याने जिल्हा परिषदेचे सर्व विभाग आता पूर्ण तयारीनिशी या लढ्यात उतरले आहेत. कोरोना रोखण्यासाठी सर्व विभागप्रमुखांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. तसेच एखादा रुग्ण सापडला तर निकट सहवासित किमान ३० लोकांचा शोध घेऊन त्यांची चाचणी किंवा त्यांना विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे.
जिल्ह्यात गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. सुरुवातीच्या काळात कमी बाधित आढळले. पण, जुलै महिन्यापासून कोरोनाचा कहर होता. हा कहर सप्टेंबर महिन्यापर्यंत चालला. त्यानंतर रुग्णसंख्या कमी होत गेली. मात्र, या वर्षी फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा बाधित वाढू लागले. मार्च महिन्यापेक्षा एप्रिलमध्ये कहर आहे. गेल्या काही दिवसांत तर हजाराच्या वर रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा आता ७९ हजारांजवळ पोहोचला आहे. तर आतापर्यंत २ हजार ४३ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्ण व मृतांचा वाढता आकडा पाहता प्रशासनासमोर चिंता निर्माण झाली आहे. त्यातूनच जिल्हा परिषदेने कोरोना रोखण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे.
जिल्हा परिषदेत विविध विभाग कार्यरत आहेत. या विभागांच्या प्रमुखांकडे काही जबाबदारी देण्यात आली आहे. तर कोरोना लसीकरण मोहीमही जिल्ह्यात वेगाने सुरू आहे. आतापर्यंत पावणेचार लाखांहून अधिक नागरिकांना कोरोनाचा डोस देण्यात आला आहे. लस उपलब्ध होईल, त्याप्रमाणात मोहीम वेगाने सुरू आहे. ही मोहीम यशस्वी होण्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याकडे एका तालुक्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे लसीकरणातील अडथळ्यांचे प्रमाण नगण्य झाले आहे.
यामधील महत्त्वाची बाब म्हणजे बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध. कारण, एका रुग्णामुळे त्याच्या निकट आलेल्या अनेकांना कोरोनाची बाधा होऊ शकते. यासाठी अंगणवाडी सेविका, आशा सेविका, आरोग्य सेवक काम करत होते. पण, त्यांच्या जोडीला प्राथमिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रावर चार तंत्रस्नेही शिक्षक तर उपकेंद्रस्तरावर २ शिक्षक कार्यरत असणार आहेत. या माध्यमातून रुग्णाच्या संपर्कातील ३० लोकांचा शोध घेऊन त्यांची तपासणी किंवा त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. यामुळे गावपातळीवर कोरोना साखळी तुटण्यासाठी मदत होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने आतापर्यंतच्या कोरोना लढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून आता इतर विभागही पुढे आले आहेत. त्यामुळे कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी जिल्हा परिषदेचे सर्व विभाग सक्रिय होणार आहेत.
कोट :
जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे प्रशासन विविध उपाययोजना राबवत आहे. जिल्हा परिषदेचे सर्वच विभाग आता या कोरोना लढ्यात आहेत. प्रत्येक विभागप्रमुखांकडे एक-एक जबादारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर रुग्णांच्या संपर्कातील ३० जणांचा शोध घेण्यात येणार आहे. यामुळे कोरोना साखळी खंडित होईल. कोरोना रोखण्यासाठी लोकांचीही साथ महत्त्वाची आहे.
- विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी
...........................................................