दोन दिवसात सर्व चित्र स्पष्ट होईल - अनिल देशमुख; चव्हाण- देशमुखांची कमराबंद चर्चा 

By प्रमोद सुकरे | Published: July 3, 2023 03:58 PM2023-07-03T15:58:51+5:302023-07-03T16:01:21+5:30

आगामी निवडणुकांमध्ये राज्यात व एकूणच देशांमध्ये वेगळे चित्र निर्माण झालेले पाहायला मिळेल

All picture will be clear in two days says Anil Deshmukh, Chavan-Deshmukh discussion | दोन दिवसात सर्व चित्र स्पष्ट होईल - अनिल देशमुख; चव्हाण- देशमुखांची कमराबंद चर्चा 

दोन दिवसात सर्व चित्र स्पष्ट होईल - अनिल देशमुख; चव्हाण- देशमुखांची कमराबंद चर्चा 

googlenewsNext

कऱ्हाड : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटातील काही आमदार आमच्या संपर्कात आहेत. ते अजूनही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांना फोन करून आम्हाला परत यायचं आहे असे सांगत आहेत. त्यामुळे याबाबत एक दोन दिवसात संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. अनेक आमदार परत राष्ट्रवादीमध्ये आलेले दिसतील असे मत राष्ट्रवादी चे नेते, माजी मंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करून महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचा एल्गार केला. त्यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख ही उपस्थित होते. कार्यक्रम झाल्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कराड येथे शासकीय विश्रामगृहात माध्यमांशी संवाद साधला. 

देशमुख म्हणाले, आज गुरुपौर्णिमा असल्याने व खासदार शरद पवार यांचे गुरु दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन शरद पवार यांनी महाराष्ट्रभर व महाराष्ट्राच्या बाहेर राष्ट्रवादीची ताकद वाढविण्यास आजपासून सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना एकत्रितच आहेत. राज्यभर महाविकास आघाडीला वातावरण चांगले आहे. पुढील सर्वच निवडणुका आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढणार आहोत. त्यामुळे इथून पुढे सर्व निवडणुकांमध्ये राज्यात व एकूणच देशांमध्ये वेगळे चित्र निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळेल. 

महाराष्ट्राबरोबरच अनेक राज्यांमध्ये व एकूणच देशभर ईडी व सीबीआयच्या कारवाईची परिस्थिती आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. अशा परिस्थितीमध्येही आम्ही सर्वजण एकत्र येऊन राष्ट्रवादी पक्षाला मजबूत करण्यासाठी काम करणार आहे. मला खोट्या आरोपांमध्ये अडकवण्यात आले होते. माझ्यावर झालेल्या आरोपांची चौकशी झाली आणि हायकोर्ट व सुप्रीम कोर्टात हे प्रकरण गेले. त्यावेळी अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही, त्याचे कोणतेही पुरावे नाहीत, झालेले सर्व आरोप ऐकीव माहितीचे आहेत, असे प्रथम हाय कोर्टाने सांगितले. त्यावर नंतर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केला, असेही ईडीच्या कारवाईबाबत विचारले असता देशमुख यांनी सांगितले.

पृथ्वीराज चव्हाण- अनिल देशमुख यांची कमराबंद चर्चा 

काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यात आज शासकीय विश्रामगृहावर सुमारे १ तास कमराबंद चर्चा झाली. या चर्चेचा तपशील समजू शकला नाही. मात्र महाविकास आघाडीच्या भविष्यातील वाटचालीबाबत चर्चा झाल्याचे विश्वसनीय सूत्राकडून समजते.

Web Title: All picture will be clear in two days says Anil Deshmukh, Chavan-Deshmukh discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.