निगेटीव्ह रक्त उपलब्धतेची पॉझिटीव्ह कहाणी!, सातारकरांची एकजुटी
By प्रगती पाटील | Published: November 30, 2023 07:23 PM2023-11-30T19:23:53+5:302023-11-30T19:24:11+5:30
शासकीय पातळीवर तुटवडा; समाज माध्यमातून जुळवाजुळव
सातारा : सिझेरियन पध्दतीने बाळंतपण झाल्यानंतर तासाभराने महिलेला अतिरक्तस्त्राव होऊ लागला. शरिरातून रक्तस्त्राव झाल्याने महिलेची प्रकृती खालवली. ओ निगेटीव्ह या रक्ताचा जिल्ह्यातील सर्वच रक्त पेढ्यांमध्ये तुटवडा होता. समाजमाध्यमावर याविषयीची माहिती व्हायरल झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच रक्तदाते उपलब्ध झाले. त्यांनी रक्तदान केल्यामुळे या महिलेचे पुढील उपचार सुरू झाले. महिलेवर उपचार करण्यासाठी अद्यापही काही दात्यांनी रक्तदान करण्याची गरज आहे.
कोरेगाव तालुक्यातील बिचुकले या गावातील २७ वर्षीय महिला सिझेरियन पध्दतीने बाळंत झाली. रक्तस्त्राव झाल्यामुळे तिला ओ निगेटीव्ह रक्तगटाची गरज भासली. जिल्ह्यातील सर्वच रक्तपेढ्यांमध्ये हे रक्त उपलब्ध नसल्यामुळे बिचुकले गावचे सरपंच प्रशांत पवार यांनी सोशल मिडियाचा आधार घेत रक्तदात्यांनी शोधण्याचे आवाहन करणारी पोस्ट टाकली. बघता बघता ही पोस्ट अनेकांच्या स्टेटसवर झळकु लागली. तातडीने उद्योजक कन्हैय्यालाल राजपुरोहित, रेणू येळगावकर, तेजस्विनी जाधव या ओ निगेटिव्ह रक्तगट असलेल्यांनी तातडीने जाऊन रक्तदान केले. त्यांनी केलेल्या रक्तदानामुळे महिलेवरील उपचार सुरू झाले.
साठा आवश्यक
जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमध्ये सर्वच रक्तगटाचे रक्त उपलब्ध असणे आवश्यक आहे. विशिष्ट रक्तदगट दुर्मिळ असल्याची माहिती असलेल्या शासकीय यंत्रणांनी या रक्तगटांचे रक्ताचा किमान साठा स्वत:कडे ठेवणे अपेक्षित आहे. ओ निगेटीव्ह रक्त केवळ जिल्हा शासकीय रूग्णालयातच उपलब्ध होते. पण तेही गर्भवती महिलेसाठी राखीव ठेवल्याचे सांगण्यात आले. रक्तगट दुर्मिळ असेल तर त्याचे दाते शाेधून त्यांना रक्तदान करण्यास प्रवृत्त करण्याची भूमिका यंत्रणांनी घेणे आवश्यक आहे.
यांनी संकटकाळी करावे रक्तदान
बी निगेटिव्ह हे रक्त गट असणारे लोक एकुण लोकसंख्येच्या अवघ्या दीड टक्के आहेत. एबी निगेटिव्हचे लोक एकूण लोकसंख्येच्या ०.६ टक्के आहेत. तर एबी पॉझिटिव्ह रक्तगटाचे लोक ३.४ टक्के आहेत. त्यामुळे बी निगेटिव्ह, एबी निगेटिव्ह, एबी पोझिटिव्ह हे रक्तगट असलेल्या लोकांनी शिबिरांमध्ये रक्तदान करण्यापेक्षा गरजेच्यावेळी रक्तदान करण्याची तयारी ठेवणे आवश्यक आहे.
ओ निगेटिव्हचा तुटवडा यासाठी!
ओ निगेटिव्ह रक्तगट असणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे हा रक्तगट दुर्मिळ नाही. या रक्तगटाला युनिर्व्हसल डोनर असे संबोधले जाते. याचे कारण म्हणजे ओ निगेटिव्ह रक्तगट असलेल्या व्यक्तीचे रक्त सर्व रक्तगटांना चालु शकते. या उलट ओ निगेटिव्ह असलेल्या व्यक्तिला ओ निगेटिव्ह रक्तच लागते, त्यामुळे याचा तुटवडा कायम भासतो. एबी पाॅझिटीव्ह असा रक्तगट आहे ज्याला सगळ्यांचे रक्त चालु शकते. मात्र, देताना तो फक्त एबी पाॅझिटीव्ह असलेल्याच रक्तदान करू शकतो.
कोणतीही शस्त्रक्रिया करताना रूग्णाचा रक्तगट असलेले रक्त राखीव ठेवायला सांगितले जाते. गर्भवती महिलांच्या बाबत इर्मजन्सीची परिस्थिती निर्माण झाली तर एेनवेळी रक्त शोधण्याची धावपळ करावी लागते. यासाठी दुर्मिळ आणि निगेटीव्ह रक्तगट असणाऱ्यांनी आपल्या फोनच्या यादीत स्वत:च्या रक्तगटातील व्यक्तींचेही नंबर ठेवणे आवश्यक आहे. - डाॅ. सुरेश शिंदे